भंडारा : अगोदर कोरोनाची दुसरी लाट आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा दीड महिन्यांपासूनचा संप यामुळे जिल्ह्यात केवळ चार महिने एसटी धावली आहे. संपकाळातील ५४ दिवसांत जिल्ह्यातील सहा आगार मिळून महामंडळाला जवळपास २१ कोटींचा तोटा झाला आहे. अजूनही प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये आली. यावेळी एप्रिल ते सप्टेंबर या दरम्यान एसटी सेवा प्रभावित होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये दुसरी लाट आली आणि मार्च ते जून या दरम्यान एसटीची चाके पुन्हा जागेवरच थांबली. कोरोनाच्या लाटेत १० महिने एसटी जागेवरच असल्याने महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला.
२०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आणि मार्च ते जून या दरम्यान एसटीची सेवा प्रभावित झाली. संपाची घंटा वाजल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना पगारामध्ये भरघोस वाढ दिल्यानंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर अडले आहेत. त्यामुळे तोटा वाढत आहे. यापूर्वी कधीच एवढे नुकसान झाले नाही.
संपामुळे ५४ दिवस
जिल्ह्यात साधारणत: ५ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. जवळपास ५४ दिवस कर्मचारी संपावर असल्याने या काळात जिल्ह्यातून एकही बस धावू शकली नाही. भंडारा आगारासह आज सहाही आगारातील कर्मचारी अजूनही संपावरच आहेत.
एसटीविना प्रवासाची सवय लागते की काय?
एसटी कर्मचाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे आता प्रवासी संतप्त झाले आहेत. आता कोणी एसटीची वाट पाहत थांबणार नाही. अशाने एसटी महामंडळ फार दिवस चालू शकणार नाही. एसटी कर्मचारी प्रवाशांना वेठीस धरत असल्याने आता विलीनीकरण नकोच असे मला वाटते.
संदीप हटवार, प्रवासी, भंडारा
आधी कोरोना आणि आता संपामुळे एसटीची सेवा बंदच आहे. त्यामुळे खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. एसटीविना प्रवासाची सवय लागते की काय? अशी शंका आहे. पण आता एसटीच्या संपाचे कोणाला काहीच वाटत नाही. सरळ सरळ एसटीचे खासगीकरण करुन टाकायला पाहिजे.
मनोज केवट, प्रवासी, भंडारा