भंडारा : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एकट्या भंडारा विभागाचे तब्बल आठ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दीड हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले असून, ३६७ बस आगारात उभ्या आहेत. यामुळे आता प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. भंडारा विभागात संपाची सुरुवात ३० ऑक्टोबर रोजी तुमसर आगारातून झाली. दुसऱ्या दिवशी ३१ ऑक्टोबरला तिरोडा आणि गोंदिया आगारातील कर्मचारी, तर २ नोव्हेंबरपासून साकोली, भंडारा आणि पवनी आगारातील कर्मचारी संपावर गेले आहेत. गत १७ दिवसांपासून एसटीची बससेवा बंद आहे. त्यामुळे दररोज सरासरी ४५ लाखांचे नुकसान होत असून, आतापर्यंत तब्बल ८ कोटी रुपयांचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे.
भंडारा विभागात भंडारा, पवनी, साकोली, तुमसर, तिरोडा आणि गोंदिया असे सहा आगार आहेत. या आगारात १,८३५ कर्मचारी कार्यरत आहेत. ३६७ बसेस असून, दररोज २,६५२ फेऱ्या होतात. मात्र, संपापासून दीड हजार कर्मचारी कामावर आले नाहीत. त्यामुळे सर्व बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. ऐन सणासुदीच्या काळात बससेवा बंद असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवाळीच्या पर्वात बाहेरगावी जाणाऱ्यांना खासगी वाहनाने अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. एसटी महामंडळाचा संप कधी मिटणार, याची प्रतीक्षा सर्वांना आहे.
...तर सेवा समाप्तीची कारवाई
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागात रोजंदारी कर्मचारी आहेत. संपाच्या कालावधीत रोजंदारी कर्मचारीही कामावर येत नाहीत. त्यांना कामावर येण्यासाठी भंडारा विभागाचे प्रभारी विभाग नियंत्रक महेंद्र नेवारे यांनी बुधवारी नोटीस बजावली. २४ तासात कामावर हजर व्हा अन्यथा सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल, असे बजावण्यात आले आहे. भंडारा विभागातील ७९ चालक, ९ वाहक आणि दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांना ही नोटीस बजावली आहे. आता किती कर्मचारी कामावर येतात, याकडे संपकरी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पोलीस संरक्षणात निघाली एक फेरी
संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी परिवहन महामंडळाने १५ नोव्हेंबर रोजी साकोली भंडारा ही बसफेरी काढली. पोलीस संरक्षणात काढण्यात आलेल्या या फेरीत ११ प्रवासी होते, तर साकोली परतीच्या प्रवासात ३३ प्रवासी होेते. परंतु एका फेरीनंतर पुन्हा दुसरी फेरी काढण्यात आली नाही. पहिल्या फेरीवर आलेल्या कर्मचाऱ्यांनी बसकडे येणे टाळले. त्यामुळे हाही प्रयोग फसल्याचे दिसत आहे.