लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीच्या पर्वात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी संपावर गेले आहेत. परिणामी एसटीची सेवा विस्कळीत झाली असून भाऊबिजेनिमित्त माहेरी येणाऱ्या महिला भगीनींचीही कुचंबना होत आहे. एसटीचासंप सुरुच असून, तू सांग दादा कशी येऊ ओवाळायला, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे संप चिघळण्याच्या स्थितीत आहे.राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करावे यासह अन्य मागणीला घेऊन एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सहा पैकी पाच आजार संपात सहभागी झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात विभागात रोज १३२६ फेऱ्यांपैकी दररोज १२९५ फेऱ्या रद्द होत आहेत. परिणामी रोज जवळपास ४५ लाखांचे नुकसान भंडारा विभागाला सोसावे लागत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचारी संपावर गेल्याने प्रवाशांचीही प्रचंड गैरसोय होत आहे. दिवाळीच्या सुट्या असल्याने सध्या माहेरी येणाऱ्या महिलांना याचा चांगलाच फटका बसत आहे. भाऊबिजेनिमित्त अनेक महिला माहेरी येतात. मात्र एसटीच बंद असल्याने खासगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागणार आहे. किंबहुना संप मिटण्याचे कुठलेही लक्षण दिसत नाही. न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा व गोंदिया आगार पूर्णत: बंद असल्याने त्या जिल्ह्यात भंडारा आगारातून गेलेल्या फेऱ्या परत येतात. भंडारा जिल्ह्यातून पवनी, साकोली व तुमसर आगार बंद आहेत. फक्त भंडारा आगारातून फेऱ्या सुरु आहेत. त्यामुळे बसस्थानकावर गर्दी दिसत असली तरी एसटीच्या फेऱ्याच रद्द होत असल्याने प्रवाशांना गंतव्यस्थळी पोहचणे कठीण जात आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील तुमसर, साकोली, पवनी येथील एसटीचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. याशिवाय वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असली तरी त्यावर अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही.
अवैध वाहतूक जोमात- दरम्यान दिवाळीच्या पर्वात एसटीची चाके थांबल्याने अवैध वाहतुक जोमात दिसुन येत आहे. ट्रॅव्हल्स चालकांनी तर प्रचंड मनमानी सुरु केली आहे. अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. त्यामुळेही प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. तर दुसरीकडे राज्य परिवहन महामंडळ आर्थिक डबघाईस आले असताना या संपामुळे मंडळ रसातळाला जाणार काय? अशीही चिंता सतावत आहे.
ऐन दिवाळीच्या पर्वात प्रवाशी वाढत असल्याने महसुलात वाढ होत असते. याचा विचार करुन संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची गरज आहे. एसटीच्या दररोज जवळपास १२९५ बसफेऱ्या रद्द होत आहेत. याचा मोठा परिणाम महसुलावर पडत आहे.-डाॅ.चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतुक अधिकारी, भंडारा.