भंडारा : राज्यभरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता अनेक मार्गांवरील एसटी बसेस धावू लागल्या आहेत. त्यातच प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्याने आता राज्यासह परराज्यातही एसटी बसेस धावू लागल्या आहेत. भंडारा विभागात एसटीचे सहा आगार आहेत. त्यातच भंडारा, गोंदिया जिल्ह्यांलगत मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यांची सीमा असल्याने तुमसर आगारातून वाराशिवणी, गोंदिया, बालाघाट, छत्तीसगड तसेच भंडारातून गोंदिया, बालाघाट, वाराशिवणी अशा अनेक बस सुरू केल्या आहेत. यासाठी प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. एसटी महामंडळाच्या उत्पन्नातदेखील यामुळे भर पडत आहे. एसटी महामंडळाने प्रवासी हिताला नेहमीच प्राधान्य दिले असून उत्पन्नासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. लांब पल्ल्याच्या मार्गावरील शिवशाही, एशियाड बसेस सुरू केल्याने प्रवासी एसटीकडे आकर्षित होत आहेत.
बॉक्स
तुमसर वाराशिवणी मार्गावर गाड्या फुल्ल..
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यालगत मध्यप्रदेश राज्याची सीमा असल्याने मध्यप्रदेशातील अनेक नागरिक भंडारा जिल्ह्यातील विविध कामानिमित्ताने येतात. तुमसर आगारातून वाराशिवणी, रामपायली, गोंदिया, कटंगी, खैरलांजी, बालाघाट अशा अनेक एसटी बसेस सुरू केल्या आहेत. या बसेसना प्रवाशांचा प्रतिसादही मिळत आहे.
बॉक्स
१०० टक्के चालक व वाहकांचे लसीकरण पूर्ण...
एसटी महामंडळाच्या अनेक बसेस जिल्ह्याबाहेरही सुरू केल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने आरोग्य विभागाच्या मदतीने विभागीय कार्यालयात कोरोना लसीकरण शिबिर राबविले. यात शंभर टक्के चालक व वाहकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी डॉ. चंद्रकांत वडस्कर यांनी दिली.
बॉक्स
परराज्यात जाणाऱ्या बसेस
तुमसर-वाराशिवणी
वाराशिवणी-तुमसर
बालाघाट-भंडारा
भंडारा-वाराशिवणी
कोट
भंडारा विभागात एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन उपक्रमांवर भर दिला जात आहे. एसटीकडे प्रवाशांचा कल अधिक आहे. हे लक्षात घेत परराज्यातदेखील अनेक बसेस सुरू केल्या आहेत. या बसेसनाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांनी मास्कचा वापर करावा.
डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा