तुमसर : ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या मागील अनेक महिन्यांपासून जैसे थे असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची फरफट होत आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन व सेवानिवृत्तिवेतन तीन ते चार महिने नियमित होत नाही. नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता व त्यांची वाढीव रक्कम अजूनपर्यंत मिळालेली नाही. १२ ते २४ वर्षांच्या पदोन्नतीचा लाभ अजूनपर्यंत कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. सातवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत लागू करण्यात आला नाही. दुसरीकडे, इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्त भत्त्याची रक्कम व १२ ते २४ वर्षांच्या पदोन्नतीचा लाभ मिळाला नाही. सातवा वेतन आयोग अजूनपर्यंत लागू करण्यात आला नाही. इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना मात्र नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्त्याची रक्कम, १२ ते २४ वर्षांच्या पदोन्नतीचा लाभ व सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.
काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला; परंतु अजूनपर्यंत त्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. २०१६ पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे निवृत्तिवेतन व राज्य कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यात यावा, असा आदेश राज्य सरकारने काढलेला आहे; परंतु पाणी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत कार्यरत व २०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत सातव्या वेतनाप्रमाणे निवृत्तिवेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यात असंतोष आहे. उपविभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गटविमा अजूनपर्यंत मिळालेला नाही. सदर समस्या तत्काळ दूर कराव्यात, अशी मागणी पाणीपुरवठा विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी टी. एस. कापगते यांनी केली आहे.