लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपाला भंडारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून राज्य सरकारी, निमसरकारी, कामगार, कर्मचारी, शिक्षक या संपात सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात दिवसभर शुकशुकाट दिसत होता. तर या संपामुळे सामान्य नागरिकांची कामे खोळंबल्याने त्यांची कुचंबना झाली.या संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, राज्य महसूल कर्मचारी संघटना, राज्य गर्व्हनमेंट नर्सेस फेडरेशन यासह अन्य संघटना सहभागी झाल्या होत्या. गुरूवारी झालेल्या संपात मात्र कोरोना संसर्गाबाबत सजगता बाळगण्यात आली. कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता सामाजिक अंतर पाळून व मास्क लावून जिल्ह्यातील सर्व कर्मचारी, कामगार यांनी त्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. भंडारा शहरातील त्रिमुर्ती चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक यांचे आर्थिक, सेवाविषयक व हक्कविषयक अधिकारांचे हणन थांबविण्यासाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने गत सहा दशकापासून केंद्र व राज्य पातळीवर लढा देत आहे. २७ राज्यातील ८० लाख राज्य सरकारी कर्मचारी आजच्या संपात एकत्रित आल्याची माहिती देण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. भंडारा येथे आयोजित निदर्शन प्रसंगी रामभाऊ येवले यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. संचालन जाधवराव साठवणे यांनी तर आभार राजेश राऊत यांनी मानले. मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांनी स्विकारले. यावेळी रामभाऊ येवले, सुनील मदारकर, एस.बी. भोयर, जाधवराव साठवणे, राजेश राऊत, विशाल तायडे, राजू बडवाईक, प्रमोद लाखडे, दिलीप रोकडे, श्याम राठोड, अतुल वर्मा, टी.आर. बोरकर, प्रमोद तिडके, जयेश वेदी, कर्षिल मस्के, अजय जनबंधू, चंदा झलके, गौरीशंकर मस्के, विरेंद्र ढबाले, एस.एस. साखरवाडे, भावना आयलवार, कृतीशिल निवृत्त अधिकारी, कर्मचारी संस्था भंडाराचे माधवराव फसाटे, गोविंदराव चरडे, रमेश व्यवहारे आदी उपस्थित होते. या आंदोलनाने दिवसभर शासकीय कार्यालयात शुकशुकाट होता. बँकांमध्येही अशीच स्थिती दिवसभर दिसून आली.
पवनी येथे आंदोलन पवनी येथेही राज्य कर्मचारी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका प्रतिनिधी चरणदास शेंडे यांनी तहसील कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक केले. याप्रसंगी सुरेश हाके, प्रभाकर शेंडे, रमेश शेंडे, बडवाईक, रमेश आवारी, पुरूषोत्तम भोयर, अमित वासनिक व इतर कर्मचारी उपस्थत होते. अन्य तालुकास्थळीही कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपात सक्रीय सहभाग नोंदविल्या.
अशा आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या संपादरम्यान संघटनेच्यावतीने शासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, खाजगीकरण-कंत्राटीकरण धोरण रद्द करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करा, मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे जाचक धोरण रद्द करा, देशोधडीला लावणारे नवीन कामगार कायदे रद्द करा, केंद्रीय कर्मचाऱ्यांना देय ठरणारे सर्व भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना मंजूर करा, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरा, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाअट भरण्यात याव्यात, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात याव्यात, अन्यायकारक शेतकरी कायदे रद्द करा, वेतनश्रेणीत तृटी दूर करण्यासंदर्भात बक्षी कमिटीच्या अहवालाचा खंड जाहीर करा, दरमहा सात हजार ५०० रुपये बेरोजगार भत्ता मंजूर करावा, प्रत्येक गरीब व्यक्तीला दरमहा १० किलो अन्नधान्य द्यावे, गरजू व्यक्तीला मनरेगा मार्फत किमान २०० दिवसांचा रोजगार द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.