भंडारा : मातंग समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्या अनुषंगाने २४ कोटी ६९ लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी महामंडळाच्या भंडारा जिल्हा कार्यालयातील व्यवस्थापक प्रताप पवार याला बुधवारी ४ वाजताच्या सुमारास गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागपूर येथून अटक केली. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या राज्यभरातील अनेक जिल्हा कार्यालयात जवळपास दीडशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला होता. मातंग समाजातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी कर्ज देणे तसेच इतर योजनांतील हा गैरव्यवहार करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्याकडे सोपविण्यात आला. या घोटाळ्याचे तार महामंडळाच्या भंडारा कार्यालयापर्यत जुळलेले असून या कार्यालयात २४ कोटी ६९ लाख रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला. त्यामुळे भंडारा जिल्हा व्यवस्थापक प्रताप पवार यांच्याविरुध्द जून २०१५ मध्ये भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसानंतर पवार यांना निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी पवार यांनी अग्रिम जामिन मिळावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या अर्जावर सुनावनी होईपर्यत न्यायालयाने त्याला अग्रीम जामीन मंजूर केला होता. तथापि, २७ जानेवारी रोजी न्यायालयाने पवार यांचा जामिन अर्ज नामंजूर केला. तेव्हापासून तो फरार होता. दरम्यान पवार हा भंडारा येथे उपस्थित असल्याची माहिती मिळताच गुन्हे अन्वेषण विभाग आणि भंडारा पोलीस यांनी सोमवारला सायंकाळी त्यांच्या खात रोड येथील निवासस्थानी धाड घातली. परंतु पवार यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार पोलिसांना दिली. त्यानंतर मंगळवारला त्याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय व त्यानंतर नागपूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी ४ वाजता रुग्णालयातून सुटी मिळताच गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने प्रताप पवार याला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)
साठे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2016 12:30 AM