नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे आदिवासी विकास सेवा सहकारी संस्था कार्यरत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात धान व मक्याची लागवड केली. आता हे पीक विक्रीसाठी तयार आहे. मात्र, अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांना कवडीमोल भावात धान विक्री करावी लागत आहे. येत्या ४८ तासांत केंद्र सुरू न झाल्यास अर्धनग्न आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून प्रादेशिक व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ कार्यालय, नवेगावबांध यांना दिला आहे.
आदिवासी महामंडळाअंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर १ एप्रिलपासून खरेदीला सुरुवात सुरू होऊन, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विक्री करून शेतकरी खरिपाच्या तयारीत लागतो. मात्र, या वर्षी एप्रिल, मे आणि तब्बल जून अर्ध्यावर येऊनही आदिवासी विकास महामंडळाने अद्याप धान खरेदी सुरू केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावात धान विकावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन येत्या दोन दिवसांत खरेदी सुरू करा; अन्यथा अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल, या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, गोंदिया पोलीस अधीक्षक, तसेच प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, नवेगावबांध यांना देण्यात आले. शिष्टमंडळात नरेश बोरकर, पुंडलिक ठलाल, पुरुषोत्तम चोरवाडे, पतिराम राणे, योगीराज हलमारे, धनराज हर्षे, प्रेम करंडे, रूपचंद मानकर यांचा समावेश आहे.
संस्थाचालकाने मागितली उचल करण्याची हमी
जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून धान व मका खरेदीसाठी शाळा, भाडेतत्त्वावर घेण्याचे निर्देश खरेदी केंद्रांना प्राप्त झाले. त्यानुसार गोठणगाव आदिवासी सेवा सहकारी खरेदी केंद्राने दीनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रमशाळा, गोठणगाव यांच्याशी संपर्क साधला. संस्था संचालकांनी नोटरी मागितली त्यानुसार शाळेचा पूर्ण परिसर स्वच्छ व रंगरंगोटी व इतर अटी संस्थेने मान्य केल्या; मात्र २६ जूनला शाळा रिकामी हवी अशी संस्थाचालकांनी मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित आश्रमशाळेत धान व मका खरेदी करण्याची कार्यवाही केली. मात्र दीनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी दोन लाख रुपये अनामत रक्कम शाळेची रंगरंगोटी व २६ जूनला शाळा खाली करून देण्याची हमी मागितली आहे; पण हे शक्य नाही. त्यामुळे ही अडचण जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया, व प्रादेशिक कार्यालय, भंडारा यांना कळविले आहे.
- गणेश सावळे, उपप्रादेशिक अधिकारी, नवेगावबांध