सन २०१९-२० मध्ये मोहाडी येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीमध्ये आयसोलेशन वाॅर्ड तयार करण्यात आला होता. त्यामुळे मोहाडी तालुक्यातील अनेक कोरोना रुग्णांना सोयीचे होत होते. तात्काळ उपचारासाठी येथे येणे सोयीचे होत असल्याने, सर्वसामान्यांना आधार मिळत होता. मात्र २०२१ मध्ये मोहाडी तालुक्यात अनेक गावात कोरोना रुग्ण वाढले असतानाही अद्याप माविम इमारतीत आयसोलेशन वाॅर्ड सुरू झाला नसल्याने, अनेक रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यांना उपचारासाठी थेट जिल्हास्तरावर अथवा नागपूरात दाखल करावे लागते. त्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पुन्हा एकदा मोहाडी येथील माविमच्या इमारतीत आयसोलेशन वाॅर्ड सुरू करण्याची मागणी तालुक्यातून जोर धरत आहे. वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांना याआधी आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक जण भंडारा, नागपूरकडे धाव घेतात. मात्र प्रवासादरम्यानच अनेकांना आपला जीव गमवावा लागतो आहे. त्यामुळे रुग्णासह नातेवाईकांची होणारी फरफट थांबविण्यासाठी मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळ प्रांगणात जास्तीत जास्त बेड व प्राणवायूसह कोरोना रुग्णांना लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यां योगिता तरारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मोहाडी येथील माविमच्या इमारतीत आयसोलेशन वाॅर्ड सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:36 AM