भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये कोरोना महामारी पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामधून जीवितहानी सुध्दा होत आहे. सध्याची परिस्थिती बघता दररोज हजारांच्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले रुग्ण आढळत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोनाची टेस्ट अजून जर वाढवल्यास प्रत्येक गावागावांमध्ये ५० ते १०० रुग्ण आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याची आरोग्य व्यवस्था बघितली तर ती अत्यंत तोकडी असून आज कोरोना रुग्णासाठी शासकीय रुग्णालय असो अथवा खाजगी रुग्णालये यामध्ये व्हेटिलेटर आणि ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे रुग्णालयांमध्ये जागा नाही, बेड नाही. नजीकच्या काळात कोरोना रुग्णांचा हा आकडा जर फुगला तर परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. याकरिता जिल्हा प्रशासनाने वेळीच दक्ष राहून उपजिल्हा रुग्णालयांमधून आणि प्रत्येक तालुकास्तरावर कोविड सेंटर उभे करावे, भंडारा शहरात किमान ३०० बेडचे जम्बो कोविड सेंटर उभे करुन त्यासाठी लागणारा आवश्यक तो मनुष्यबळ पुरविण्यात यावे, खाजगी रुग्णालयातून कोरोना पेशंट वा त्यांच्या कुटुंबीयाकडून होणाऱ्या लुटीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश डाहारे, संजय रेहपाडे, ललित बोंद्रे, अरविंद पडोळे, गजानन कळंबे, ताराचंद भुरे, संजय मडावी, नत्थू बांते, विनोद पेशने यांचा समावेश होता.
जम्बो कोरोना हॉस्पिटल तात्काळ सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:35 AM