चूलबंद खोऱ्यातील शेवटच्या टोकाला जनसामान्यांना तालुका वा जिल्ह्याला शासकीय कामाकरिता दररोज जावे लागते. आर्थिक परिस्थिती शेतीवर अवलंबून असल्याने खासगी वाहनांची कमतरता आहे. त्यामुळे शासकीय व खासगी कामाला जाताना हक्काची असलेली लाल परी सेवेत असावी, अशी अपेक्षा जनसामान्यातून उमटले आहे.
महामंडळकडून नफ्याचा रस्त्यावरच बसेस धावत असल्याचे अनुभवायला मिळत आहे. मात्र अंतर्गत रस्त्यांवर गरज असून बसेस धावत नसल्याने शेवटच्या टोकातील नागरिकांना प्रवासासाठी बराच वेळपर्यंत रस्त्यावर ताटकळत राहावे लागते. खासगी वाहने धावत नसल्याने प्रवासाची समस्या ऐरणीवर आली आहे. हक्काची समजली जाणारी लाल परी पुन्हा जनसामान्यांच्या सेवेत कायम व्हावी, अशी मागणी आहे.
भंडारा जिल्ह्याचे स्थान असल्याने तई, कोच्ची मार्गे किटाडी परिसरातील शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्गाला व्यक्तिगत कामाकरिता जिल्ह्याला जावे लागते. मात्र कोरोनाच्या पूर्वी सुरू असलेल्या बसेस बंदच असल्याने प्रवासाची समस्या उभी आहे. तई येथे रात्रीला मुक्कामी असणारी बस सुरू करण्याची नितांत गरज आहे.
गोपीचंद भेंडारकर, जिल्हा परिषद माजी सदस्य, भंडारा
चौकट
ग्रामीण जनतेची हक्काची लाल परी ग्रामीण जनतेच्या सेवेत अजूनही दाखल झालेली नाही. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग यावरच बसेस धावताना दिसतात. मात्र यापूर्वी नियमित महामंडळाला पर्यायाने ग्रामीण जनतेला सेवा देणारी महत्त्वाची असलेली लाल परी रुसली आहे. रात्रीच्या मुक्कामाला असणारी लालपरी ग्रामीण जनतेच्या आयुष्याशी निगडित आहे.