या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नदी,नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी धान पिकाच्या शेतात घुसले तसेच सततच्या पावसामुळे धान पिकावर करपा, तुडतुडे यासारख्या इतर वनस्पतीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे पीक उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असून धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे बँका तसेच सावकारी कर्ज कसे फेडावे, मुलामुलींचे शिक्षण व लग्न कसे करावे, दैनंदिन व्यवहार कसा करावा आणि रोजगारा अभावी वितभर पोटाची खळगी कशी भरावी, येणाऱ्या खरीप हंगामात शेतीची मशागत कशी करावी असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहे.
खरीप हंगामातील शेतकामे आटोपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने ते आर्थिक विवंचनेत सापडले असून रोजगार मिळत नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. संबंधित विभाग रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यास विलंब होत असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत संबंधित विभागाच्या यंत्रणेने वेळीच दखल घेऊन लाखनी, लाखांदूर, साकोली, पवनी, भंडारा, तुमसर, मोहाडी तालुक्यातील प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, एस.के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हर्षवर्धन हुमणे, अरुण ठवरे, दामोदर उके, संदीप बर्वे, बंडू फुलझेले, अंबादास नागदेवे,रक्षानंद नंदागवळी, मंगेश मेश्राम, नितीश काणेकर, नत्थु वाघमारे यांनी रोजगार हमी योजना मंत्री, विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.