राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील धान खुल्या बाजारपेठेत न विकता शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकले. परंतु बोनसची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. शेतकऱ्यांनी खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात उन्हाळी धान पिकाचे उत्पन्न घेतले. मे महिन्याच्या सुरुवातीला सर्व धान खरेदी केंद्र सुरू होणे अपेक्षित असताना अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यातच राज्य शासनाने उन्हाळी धान पिकाची नोंद करण्यात आलेले सात-बारा धान विक्रीसाठी ऑनलाईन करण्याची मुदत कमी देऊन शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा अफलातून प्रकार झाल्याने अनेक शेतकरी सात-बारा ऑनलाईन करू शकले नाहीत. खरिपातील विक्री केलेल्या धानाचे बोनस विनाविलंब देऊन तुमसर व मोहाडी तालुक्यातील सर्वच धान खरेदी केंद्र तीन दिवसांत सुरू करावे. अन्यथा भारतीय जनता पक्ष तसेच विकास फाउंडेशन भंडाराच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार वाघमारे यांनी दिला आहे.
उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू करा - चरण वाघमारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:35 AM