महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या कटंगी मार्गावरील बावनथडी नदीवर १९८३ मध्ये सदर पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. ३५ वर्षांपासून पुलाची देखरेख झाली नाही, तसेच नागपूर- मनसर-सिवनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे बांधकाम सुरू असल्यामुळे, या मार्गावरील वाहतूक बावनथडी नदीपुलावरून वळविण्यात आली होती. परिणामी, अतिभाराचे ट्रक, तसेच मोठ्या वाहनांनी रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त अधिभाराची वाहतूक होत असल्यामुळे सदर पुलाला धोका निर्माण झाला. पुलाला वाहतुकीदरम्यान हादरे बसत असल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली होती. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रकारच्या वाहतुकीस पूल बंद केले होते. त्यामुळे दोन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ५० किलोमीटरचा फेरा घालावा लागत होता. परिणामी, नातेवाईक, शेतकरी, व्यापारी, कामगारांचे जीवन प्रभावित झाले होते. बावनथडी पूल आजही साबूत आहे. केवळ त्याचे मेंटेनन्स झाले नाही. त्यामुळे पुलाखालील स्प्रिंग निकामी झाले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व आरटीओ विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यानी पुलावरील सर्व वाहतूक तडकाफडकी बंद केली होती. पुलावरून हलके वाहनाच्या वाहतुकीस परवानगी घ्यावी, अशी मागणी आमदार राजू कारेमोरे यांच्यासह रायुकाँ तालुकाध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे पुलावरून हलके वाहनांना वाहतुकीची परवानगी देण्यात आली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पोलीस विभागाला त्या संदर्भात कसलेही पत्र प्राप्त न झाल्याने, पोलिसांनी लॉकडाऊन लागल्यानंतर नाली खोदून पुलावरील संपूर्ण वाहतूक बंद केली. परिणामी, कोरोना काळात दोन्ही राज्यांतील नागरिक प्रभावित झाले असताना, खासदार प्रफुल पटेल कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या कामाची पाहणी व खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल करण्याबाबत आढावा बैठकीसाठी रविवारी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना, ही बाब रायुकाँ अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी खासदार पटेल यांच्या निर्देशनास आणून देताच, त्यांनी कोरोना काळात आंतरराज्यीय मार्ग बंद न करता सात फूट उंचीचे वाहन जाईल, असे बॅरिकेटिंग उभारून हलके वाहनांची वाहतूक सुरू करण्याचे निर्देश दिल्याने आता लवकरच वाहतूक पूर्वरत होणार असल्याने, परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.
बावनथडी पुलावर बॅरिकेटिंग करून वाहतूक सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:36 AM