लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांच्यासंदर्भात शुक्रवारी आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वात प्रहार गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजतापासून गोसेखुर्द धरणाजवळील मेंढा येथील शंकरपटाच्या जागेवर हे आंदोलन सुरु असून वृत्त लिहीपर्यंत आंदोलक घटनास्थळी होते.विशेष म्हणजे आंदोलनकर्त्या प्रकल्पग्रस्तांनी मागण्यांची पुर्तता न झाल्यास निवासी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. या आंदोलनस्थळी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त सातत्याने येत आहेत. आंदोलन सुरु झाल्याच्या तासाभरातच प्रकल्पग्रस्तांची संख्या दोन हजारांच्यावर पोहोचली. या आंदोलनात युवक व महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.आंदोलनकर्त्यांच्या मागण्यानुसार वाढलेल्या कुटूंबाकरिता १९९७ ची अट रद्द करावी, नोकरी व रोजगाराकरिता २५ लाखरुपये देण्यात यावे, जमीन व घराकरीता बोनसच्या रुपात कोर्टानुसार मोबदला देण्यात यावा, धरणाची पातळी २४५.५०० मीटर पर्यंतच्या बाधीत गावांचे २०१९पर्यंत पुनर्वसन करण्यात यावे, बुडीत क्षेत्रातील पुनर्वसनाकरिता संपादीत केलेल्या शेतातील शेतकऱ्यांना पुनर्वसन कायद्याच्या लाभ मिळावा आदी मागण्यांकरिता सदर आंदोलन सुरु आहे.सायंकाळ उशिरापर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलनाची कोंढी फुटलेली नव्हती. जोपर्यंत शासन मागण्या मान्य करणार नाही. तोपर्यंत आंदोलनस्थळाहून प्रकल्पग्रस्त हलणार नाहीत, अशी भुमिका घेण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्त आंदोलनस्थळी राहण्याच्या तयारीने आले आहेत. आमदार बच्चू कडू काय निर्णय घेतात याकडे आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. सदर आंदोलनात एजाज अली, बाळकृष्ण जुवार, यशवंत टिचकुले, मंगेश वंजारी, विनोद वंजारी, विष्णु पडोळे, गणेश आगरे, मारोती हारगुळे, रामप्रसाद ढेंगे, भाऊराव उके, आरजू मेश्राम, प्रमिला शहारे, पुष्पा शहारे यांच्यासह हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त सहभागी झाले आहेत.
प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत आंदोलन सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:01 PM
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांच्यासंदर्भात शुक्रवारी आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वात प्रहार गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजतापासून गोसेखुर्द धरणाजवळील मेंढा येथील शंकरपटाच्या जागेवर हे आंदोलन सुरु असून वृत्त लिहीपर्यंत आंदोलक घटनास्थळी होते.
ठळक मुद्देनिवासी आंदोलनाचाही इशारा : चर्चेनंतरही कोंडी फुटेना