भेल बचाव संघर्ष समिती : पंतप्र्रधानांना पाठविले निवेदनभंडारा : विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणाऱ्या मुंडीपार सडक येथील भेल प्रकल्प त्वरित सुरु करा अन्यथा शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा, अशी मागणी भेल बचाव संघर्ष समितीने केली आहे. या आशयाचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री यांच्या नावे पाठविण्यात आले आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे १४ मे २०१३ रोजी भेल अंतर्गत सौर ऊर्जा उपकरण आणि फेब्रीकेशन प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते. तीन वर्ष होऊनही भेल प्रकल्पाचे काम अजूनही बंद आहे. दोन वर्षात भेल प्रकल्प पूर्ण होणार होता. परंतु सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाच्या लढाईत भेल प्रकल्पाला सुरु करण्याचा मूहुर्त निघालेला नाही. आधीच मागासलेला म्हणून भंडारा जिल्हा प्रसिद्ध असताना त्यात भेल सारखा प्रकल्प रखडणे ही दु:खद बाब आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागितल्यावर भारत सरकार उर्जा मंत्रालय यांच्याकडे सौर ऊर्जा प्रकल्पाचे ४० टक्के अनुदान विचाराधीन असल्यामुळे सौर उर्जा प्रकल्पाचे काम सुरु झाले नाही असे निदर्शनास आले आहे. मोर्चा, आंदोलने व कित्येकदा निवेदने देण्यात आली. परंतु भेल प्रकल्प सुरु झालेला नाही. भेल प्रकल्प सुरु करायचा नसल्यास शेतकऱ्यांच्या जमिनी परत कराव्यात अशी मागणी भेल बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देताना संघर्ष समितीचे अचल मेश्राम, अनिल निर्वाण, दादू खोब्रागडे, श्रीराम बोरकर, राजन मेश्राम, अरुण गोंडाणे, अशोक मेनपाले, मदन दुरुगकर, मदन रामटेके, होमराज कापगते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भेल प्रकल्पाचे काम सुरु करा अन्यथा जमिनी परत करा
By admin | Published: June 15, 2016 12:51 AM