धरणे आंदोलन : भेल बचाव संघर्ष समितीचे तहसीलदारांना निवेदनसाकोली : मुंडीपार स्थित भेल प्रकल्प त्वरीत सुरू करण्यात यावा, मुंडीपार ते जांभळी राष्ट्रीय महामार्गाचे अपुर्ण कामे १५ दिवसांच्या आत सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी आज भेल प्रकल्पासमोर भेल बचाव संघर्ष समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष अचल मेश्राम, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, मदन रामटेके, राजकुमार पुराम, प्रभाकर सपाटे, रामचंद्र कोहळे, वैशाली पटले यांनी केले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, तीन वर्षाचा कालावधी लोटूनही प्रकल्पामध्ये उत्पादन सुरू झाले नाही. यासंदर्भात राज्य शासनासह केंद्र शासनाच्या मंत्र्यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली. मात्र कारवाई झाली नाही. २७३३ कोटी रूपयांचे अनुदान सौर उर्जा प्रकल्पासाठी मंजुर झालेले आहेत. देशामध्ये सौर उर्जा प्लेटची मागणी लक्षात घेता या प्रकल्पाला प्राथमिकता देवून त्वरीत उत्पादन सुरू करण्यात यावे, भेल प्रकल्पाचे दोन्ही युनिट सुरू झाल्यास जवळपास १० हजार सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल. शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत. या जमिनीवर अनेक शेतमजुर मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. भेल प्रकल्पाचे काम बंद असल्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ३१ डिसेंबरपूर्वी या प्रकल्पाचे काम सुरू न झाल्यास भूसंपादित शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार आणि शेतमजूर येत्या हिवाळी अधिवेशनात तीव्र आंदोलन करेल. प्रकल्पाकरीता भूमिअधिग्रहण झालेल्या जमिनी ताब्यात घेतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.मागणीचे निवेदन साकोलीचे तहसीलदार शोभाराम मोटघरे यांना देण्यात आले. यावेळी साकोली, लाखनी, मुंडीपार, बाम्हणी, खैरी, गिरोला येथील नागरिक उपस्थित होते. संचालन सतीश मेनपाले तर आभार प्रदर्शन प्रमोद नवखरे यांनी मानले आहे. मागण्यांचे निवेदन तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, खासदार तसेच भेलच्या मुख्य व्यवस्थापकांना पाठविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
भेल प्रकल्पाचे काम सुरू करा
By admin | Published: November 21, 2015 12:34 AM