लोकमत न्यूज नेटवर्क लाखनी : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक मुख्य रस्ते खड्डेमय आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते हे समजणे कठीण झाले आहे. पाणंद रस्त्यांच्या बिकट अवस्थेमुळे शेती विकासाला ब्रेक लागला आहे. जगाच्या पोशिंद्याची यामध्ये परवड होताना पाहायला मिळत आहे. शासनाची पाणंद रस्ते विकास योजना कागदावरच दिसत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे. शेतकरी व नागरिकही त्रस्त आहेत.
केंद्र व राज्य शासनाने नागरिकांसाठी 'शासन आपल्या दारी', 'मेरी मिट्टी मेरा देश' यासारखे बरेच उपक्रम राबविले. या योजनांची उपयोगिता किती हे शासनाला व नागरिकांनाच माहीत आहे.
लोकवर्गणीतून पाणंद रस्त्यांची सुधारणा शेती व्यवसायासाठी महत्त्वाच्या असलेल्या शेत रस्त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, पदरमोड करून आर्थिकदृष्ट्या खालावलेल्या, मात्र मनाची श्रीमंती असलेल्या शेतकऱ्यांना लोकवर्गणीतून पाणंद रस्त्याची दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. तसे प्रयत्नही शेतकऱ्यांकडून होत असल्याचे चित्र लाखनी तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
शेजारील गाव व शेतात जाण्यासाठी अडचणी
- रात्री-बेरात्री शेतामध्ये जागलीकरिता, पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. रात्रीला कुणी आजारी पडले तर शेजारच्या मोठ्या गावांत किंवा शहराच्या ठिकाणी उपचारार्थ दवाखान्यात यावे लागते. मात्र, ग्रामीण रस्त्यांसह शेतशिवारातील पाणंद रस्ते आजही दुर्लक्षित आहेत.
- लाखनी तालुक्यातील पाणंद 3 रस्त्यांच्या दुरवस्थेने शेतीची वाट बिकट झाली आहे. शासनाने पाणंद रस्ते योजनेच्या नावात बदल करीत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना असे नामकरण केले आहे. मात्र, ही योजनादेखील इतर योजनांप्रमाणे कागदावरच राहिल्याने आजही पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघाला नाही, ही लाखनी तालुक्यासाठी दुर्दैवी बाब मानली जात आहे.