विरली (बु.) : येथील ग्रामपंचायत सभागृहात सोमवारी घडलेल्या तोडफोडप्रकरणी कासवगतीने सुरू असलेल्या पोलीस तपासाला गती देऊन खऱ्या दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विरलीकर ग्रामस्थांनी लाखांदूरचे तहसीलदार आणि ठाणेदारांना शुक्रवारी निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेऊन शनिवारी लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणातील विविध साक्षपुरावे घेऊन तपासाला वेग दिला आहे.
सदर तोडफोडीमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या फुटलेल्या प्रतिमांचा समावेश असून या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या खऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. या निवेदनात पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच येथील सरपंच लोकेश भेंडारकर यांनी एका कर्मचाऱ्यामार्फत तुटफूट झालेले सामान उचलून ठेवल्याची बाब विशेषत्वाने नमूद केली असून हे प्रकरण घडले की घडविण्यात आले, याविषयी शंका व्यक्त केली आहे.
गावकऱ्यांतर्फे येथील उपसरपंच मिलिंद सिंव्हगडे, बळीराम पवनकर, राकाँ युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष राकेश राऊत, वंचित बहुजन आघाडी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष स्वप्नील बन्सोड, उमेश जांगळे, युवराज सुखदेवे, राजू आत्राम आदींनी तहसीलदार व ठाणेदारांना निवेदन दिले.
बॉक्स
ठाणेदारांकडून निवेदनाची दखल
या निवेदनाची दखल घेऊन लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांनी शनिवारी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून या प्रकरणातील आरोपी, फिर्यादी आणि उपस्थित प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदवून घेतली. या घटनेविषयी गावात अनेक तर्कवितर्कांना ऊत आला असून पोलिसांसमोर खऱ्या दोषींना शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.