तुमसर शहरातील वाढती लोकसंख्या व दुचाकी, चारचाकीचे प्रमाण पाहता गत दोन वर्षांपासून शहरातून एकेरी वाहतूक सुरु केली आहे. गोंदियाकडे जाणारे जड वाहन व एसटी बस आदी वाहनांकरिता स्थानिक इंदिरानगर, विनोबानगरातून जाणाऱ्या बायपास मार्ग खुले केले. त्यामुळे सदरील रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे नेहमीच या रस्त्यावर वाहनांची वर्दळ पहावयास मिळत आहे. अवजड वाहनांमुळे संपूर्ण रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरची संपूर्ण धूळ ही परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात शिरत आहे. धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या अगोदरही अनेकदा बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले. मात्र बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेतली असल्याने जिल्हा प्रशासनाने समज देण्याची गरज आहे. तत्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी मान्य न झाल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरू असा इशारा ही निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंजिनिअर नितीन धांडे, मनोज बोपचे, कोमल वानखेडे , आशीष चौधरी , मार्गदर्शक प्रा. अमोल उमरकर व सदस्य उपस्थित होते.
तुमसरातील खड्ड्यातील रस्ताच्या दुरुस्ती बांधकाम विभागाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:38 AM