जवाहरनगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांचे थकीत प्रवासभाडे व मानधन त्वरित ग्राम रोजगार सेवकांच्या खात्यात देण्याची मागणी, महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक तालुका संघटनेने आज भंडारा येथे जलसंपदा मंत्री बच्चू कडूंना व रोहयो उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
रोजगार हमी योजनेचा उद्देश हा ग्रामीण भागातील जनतेला गावातच रोजगार उपलब्ध होण्यासाठी ग्रामीण स्तरावर शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर ग्रामरोजगार सेवक हे महत्त्वाचे केंद्रबिंदू मानले आहेत. रोजगार सेवकांच्या माध्यमातून चौमुखी मनरेगाची कामे करून घेत आहेत. यात नवीन जॉब कार्ड तयार करणे, हजेरी पत्रक काढणे व पंचायत समितीला सादर करणे, वार्षिक कृती आराखडा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लाभार्थी निवड करणे, आवास योजनेची देखरेख व एक ते सात प्रकारांचे मनरेगाचे दस्तऐवज अद्ययावत करणे, वेळोवेळी पंचायत समिती सभेला हजर राहणे आणि कुशल-अकुशल कामाचे एस्टिमेट तयार करण्यासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी विविध कार्यालयाशी संपर्क साधून, पंचायत समितीमध्ये जमा करणे आदी कामांकरिता महिन्यातून पाच ते सहा वेळापेक्षा जास्त दिवस ये-जा करावी लागते.
यासाठी शासनाने देऊ केलेले रोजगार सेवकांना प्रवासभाडे सन २०१७ पासून थकीत आहे, तर मानधन मागील एप्रिल महिन्यापासून रोजगार सेवकांच्या खात्यात जमा झालेले नाही, असे महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना तालुका भंडाराद्वारे जलसंपदामंत्री बच्चू कडूंना व रोहयो उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देणाऱ्यांमध्ये तालुका अध्यक्ष शंकर बोड्डे, उपाध्यक्ष दिलीप पडोळे, रमेश खोकले, सचिव हेमंत देवगडे, लोकेश मारवाडी, मुकेश जगनाडे, सारिका गजभिये, सिद्धार्थ कावळे, अंकुश मडामे यांचा समावेश आहे.