पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली असून, येथील क्ष-किरण यंत्र जिल्हा सामान्य रुग्णालयात आहे. येथे शवविच्छेदनगृह पालांदुरात नसल्याने समस्येत वाढ झाली आहे. यासाठी लवकरात लवकर आरोग्यसेवा सुरू करण्यासाठी खासदार सुनील मेंढे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना लाखनी भाजप तालुकाध्यक्ष धनंजय घाटबांधे, भाजयुमोचे जिल्हा संपर्कप्रमुख देवेश नवखरे, सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे, रवींद्र वागडे, आदी उपस्थित होते. पालांदूर येथे ग्रामीण रुग्णालय असून, अनेक गावांचे केंद्रबिंदू आहे. मात्र, या ग्रामीण रुग्णालयात आरोग्यव्यवस्था खिळखिळी झाली आहे. कोरोना संकटात नियमित आरोग्य व्यवस्था, चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. कोरोना काळात पालांदुरातील क्ष-किरण यंत्र जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवेत ठेवले आहे. पालांदूर ग्रामीण रुग्णालयासाठी मंजूर असतानाही येथे नसल्याने अडचणी येत आहेत. यासोबतच पालांदूर रुग्णालयासाठी क्ष किरण यंत्र टेक्निशियनही आवश्यक आहे. पालांदूरला शवविच्छेदनगृह नसल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागतो. तेव्हा तत्काळ पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा तत्पर करण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली.
आरोग्य सुविधांसाठी खासदार सुनील मेंढे यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:38 AM