लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे यांच्याद्वारे राज्यस्तरीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने दुकानदारांच्या मागण्यांसंदर्भात येथील तहसीलदारामार्फत शासनास निवेदन देण्यात आले.
निवेदनात, राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये आजच्या महागाई निर्देशांकानुसार किमान १०० रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करण्यात यावी. रेशनकार्डमधील प्रत्येक लाभार्थ्याची आधार क्रमांकासह पडताळणी अर्थात ई- केवायसी करणे ही निरंतर प्रक्रिया असायला हवी, त्यासाठी वेळेचे बंधन नसावे, तसेच ई-केवायसी व मोबाइल सीडिंग करण्यासाठी प्रति सदस्य ५० रुपये इतके शुल्क संबंधित लाभार्थ्यांकडून वसूल करण्याची परवानगी देण्यात यावी. अन्नसुरक्षा कायद्याद्वारे महाराष्ट्र राज्यासाठी मंजूर असलेल्या ७,००,१६,६८३ इतक्या इष्टांक मर्यादेत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात शिधापत्रिकेसंबंधित ऑनलाइन डेटाएन्ट्रीची सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. याकरिता संपूर्ण राज्यातील रास्त भाव दुकानदारांना आसीएमएस लॉगइन करून देण्यात यावेत. शासकीय धान्य गोदामातून देण्यात येणारे अन्नधान्य हे केवळ जूट बारदानामध्येच देण्यात यावे, ५० किलोच्या प्लास्टिक पिशवीमध्ये देण्यात येऊ नये, तसेच संपूर्ण राज्यामध्ये एनपीएच प्रवर्गातील केशरी शिधापत्रिकाधारकांना देखील अन्नधान्य देण्यात यावे. संपूर्ण राज्यामध्ये अंत्योदय योजनेतील सातपेक्षा अधिक सदस्य असणाऱ्या साधारण ९० हजार शिधापत्रिका अंत्योदयऐवजी प्राधान्य कुटुंब योजनेत वर्ग करण्यात याव्यात आदी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी अध्यक्ष स्वस्त धान्य डिलर संघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद कारेमोरे, गुलराजमल कुंदवानी, ठाकुरदास वासनिक, शकुंतला वघारे, गोपीचंद गायकवाड, दिगंबर देशभ्रतार, मनीष लालवाणी, भूपेंद्र तलमले, सुनीता कांबळे, मोहन मलेवार, कुलदीप श्रीचंदानी, रमेशचंद्र धोटे, सदानंद बडवाईक, डी.बी. गभणे, रोशन मेश्राम, राजू गायधने, सुशील सेलोकर, केरवंता पटले, भजनलाल टेंभरे, एस. एस. गजाम आदी उपस्थित होते.