चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सिलेगाव येथे प्रोसेडिंग बुकवरून झालेल्या मारहाणीत सरपंचांवर हेतुपुरस्सर ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा रद्द करण्यासाठी तुमसर तालुका संघटनेच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. ग्रामसेविकेला अटक करण्याची मागणी निवेदनात केली असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे सरपंचविरोधात ग्रामसेवक संघटना असा वाद होण्याची शक्यता आहे.
प्रोसेडिंग बुकच्या पळवापळवीवरून सिलेगाव ग्रामपंचायतमध्ये सरपंच, सदस्य तथा ग्रामसेविका यांच्यात भर रस्त्यावर वाद झाला. ग्रामसेविका सरपंचाचे जनतेच्या कामात ऐकून घेत नसल्याने वारंवार सरपंच व ग्रामसेविका यांच्यात खटके उडत होते. यासंदर्भात सरपंचांनी पंचायत समितीस्तरावर बीडीओ यांना तक्रारी केल्या होत्या. परंतु विस्तार अधिकारी यांनी साधी चौकशी केली नाही. यामुळे वाद वाढतच गेला. ग्रामसेविका मंजूषा शहारे गावात पक्षपातपूर्ण कामे करीत होते. गावकरी कामे होत नसल्याचे आरोप सरपंचावर करीत असल्याने भांडण विकोपाला गेले. तक्रारीच्या अनुषंगाने मध्यस्थी करण्याचे प्रयत्न पंचायत समितीस्तरावरून झाले नाहीत. यामुळे लोकसेवक भांडले. प्रोसेडिंग बुकचा वाद सुरू असताना सरपंच यांनी जातिवाचक शिवीगाळ केली नाही. या शिवाय भांडणात सहभाग घेतला नाही; परंतु ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात सरपंचाला अडकविण्यात आले आहे. हेतुपुरस्सररीत्या अडकविण्यात आल्याचा आरोप सरपंच संघटनाने केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन लांजेवार यांच्या नेतृत्वात पोलिसांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सरपंच उमेश बघेले, अविनाश उपरीकर, महेश पटले, गुरुदेव भोंडे, नरेंद्र कुंभारे, नत्थू शरणागत, वैशाली पटले, गळीराम बांडेबुचे, सहादेव धबाले, चंदा ठाकरे, मधू अडमाचे, राजेश बारमाटे, सविता पारधी, संध्या गुरवे, ऊर्मिला लांजे, कोमल टेभरे, पमू भगत, गणेश इलपाते, बी. आर. झोडे, सरिता राठोड, मनोहर सोनेवणे, साईनाथ उईके, जयप्रकाश पवारे, गणेश ठाकूर उपस्थित होते.