साकोली : शहरातील प्रभाग क्रमांक सहातील डाकघर कार्यालयामागील गुप्ता कॉलनीतील प्रलंबित समस्यांचे तात्काळ निराकरण करावे यासाठी नागरिकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले.
प्रभाग सहातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ते उत्तरेकडे गुप्ता कॉलनी विविध सेवा सहकारी सोसायटीजवळील पाइपलाइन कित्येक महिन्यांपासून फुटली आहे. त्यातून रोज हजारो लिटर पाणी प्रभागात वाया जात आहे. याने चिखलाचे साम्राज्यात घाण, त्यात डास, विषारी किडे व जीवजंतूने येथील बालकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील मुख्य सिमेंट रोडमधून गज दिसत असून रोड पूर्णत: उखडलेला आहे. याने रोडवर गिट्टीचुरी व क्षतिग्रस्त मार्गावर वाहने चालविणे कठीण झाले.
लहान मुलांसोबत येथे वाहनांद्वारे गिट्टी उडून सूक्ष्म अपघाताची चिन्हे दिसत आहेत. प्रभाग ७ चे कार्तिक लांजेवार यांच्यानुसार विठ्ठल-रखूमाई मंदिर परिसरातील मार्ग हा उखडला असून, येथे बालकांसोबत अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व रास्त मागण्या तात्काळ निकाली काढाव्यात, अशी मागणी आहे. निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते आशिष गुप्ता, फ्रीडम संघटनेचे अध्यक्ष किशोर बावणे, अविनाश गुप्ता, अमोल परशुरामकर, राजू पटेल, पार्थ गुप्ता, नितीन डोंगरवार, कावळे गुरुजी, नयन भिवगडे, धीरज तरोणे, सागर पुस्तोडे, मंगेश ठेंगरी, प्रवीण कांबळे, अस्सू पठाण आदी उपस्थित होते.