ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्वसामान्य जनतेचा थेट संबंध येणा-या महसूल विभागात राज्यात सर्वाधिक एसीबीचे ट्रॅप झाल्याचे दिसून येते. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गत ११ महिन्यात केलेल्या कारवाईत १८९ प्रकरणात १५ अधिकाऱ्यांसह २४० कर्मचारी अडकले आहेत. त्यात ३३ खासगी व्यक्तींचाही समावेश असून २० लाखांच्यावर लाचेची रक्कम आहे.लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने राज्यात १ जानेवारी ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ७६३ सापळे यशस्वी केले. यात एक हजार १२ जणांना लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. त्यात सर्वाधिक प्रकरणे राज्यातील महसूल विभागातील आहेत. महसूल विभाग थेट जनतेच्या संपर्कात येणारा विभाग आहे. विविध प्रमाणपत्र आणि कामांसाठी नागरिकांना तलाठ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यत धाव घ्यावी लागते. महसूल विभागतील काम वेळेवर होण्याची कधीच खात्री नसल्याने लाचखोरीला पठबळ मिळते.गत ११ महिन्यात एसीबीने केलेल्या कारवाईत महसूल विभागाचे २४० अधिकारी - कर्मचारी अडकले आहेत. त्यात चार प्रथम श्रेणी अधिकारी, ११ द्वितीय श्रेणी अधिकारी, १६९ तृतीय श्रेणी आणि १९ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासोबतच चार इतर लोकसेवक आणि ३३ खासगी व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्याकडून कारवाई करताना २० लाख ८० हजार ९०० रुपये जप्त करण्यात आले.पोलीस खातेही आघाडीवरमहसूल विभागापाठोपाठ राज्यात लाचखोरीत पोलीस खातेही आघाडीवर असल्याचे दिसून येते. ११ महिन्यात राज्यात १५९ प्रकरणात २०९ पोलीस अडकले आहेत. त्यात ११ प्रथमश्रेणी अधिकारी आहेत. तर १७० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासोबत पंचायत समिती, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, वन विभाग, महानगर पालिका, वीज वितरण कंपनी, आरोग्य विभाग, कृषी, सहकार व पणन आदी विभागही लाचखोरीच्या प्रकरणात आघाडीवर असल्याचे दिसून येते.