मुंडीकोटा : आरटीपीसीआर अहवालाला विलंब होतो. तो एका दिवसात मिळत नाही, तर रॅपिड अँटिजेन तपासणी किटचा तुटवडा आहे. त्यामुळे अहवाल येईपर्यंत संशयित कोरोनाबाधितांचा मुक्काम घरीच आहे. अहवाल निगेटिव्ह आला तर बरे, पॉझिटिव्ह आला तर, रुग्णांसह त्याच्या कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहात नाही. हा प्रकार थांबविण्याकरिता योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे.
कोविड - १९च्या पहिल्या लाटेत शहरे हाॅटस्पॉट झाली होती. आता दुसऱ्या लाटेत गावेच्या गावे हॉटस्पॉट ठरत आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. दरम्यान, कोरोनाची बाधा झाली की नाही, याची तपासणी आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून केली जाते. आरटीपीसीआर चाचणी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात करून जिल्ह्याच्या ठिकाणी तपासणीकरिता पाठविण्यात येते. रॅपिड अँटिजेन तपासणीचा अहवाल त्याच दिवशी मिळतो. आरटीपीसीआर तपासणी नमुना प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळत असल्याने तोच नमुना घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविण्यात येतो आणि त्याच अहवालाची वाट बघावी लागते. यामुळे कोविड-१९ ला अंगावर घेण्याचा धोका निर्माण होतो. आरटीपीसीआर तपासणी अहवाल देण्यासाठी २४ ते ४८ तासांचे सुतोवाच आहे. पण अहवाल मिळण्यास ८ ते १२ दिवस वाट बघावी लागते. शिवाय मोबाईलवर सेवा देण्याची सुविधा असली तरी ती सेवादेखील मिळत नाही. गावागावांत रॅपिड अँटिजेन व आरटीपीसीआर नमुने घेतले जातात. रॅपिड अँटिजेन तपासणी अहवाल सायंकाळपर्यंत प्राप्त होत असल्याने सकारात्मक रुग्णांवर उपचार करणे सोयीचे ठरते. प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटिजेन किट उपलब्ध झाल्यास जिल्हा आरटीपीसीआर यंत्रणेवरील ताण कमी होऊ शकेल. मात्र, रॅपिड अँटिजेन तपासणी किट उपलब्ध केली जात नसल्यामुळे अनेकांंना आरटीपीसीआर तपासणी अहवालाची वाट बघावी लागते. यामुळेही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.