युवराज गोमासे करडीप्रत्येक बांधकामाला रेतीची गरज आहे. मात्र रेतीघाट महसूल विभागाने सिल केले आहेत. चोरी व अवैध वाहतुक रोखण्यासाठी महसूल कर्मचारी व पोलिसांचा रात्रंदिवसाचा पहारा लावण्यात आला आहे. चोरट्यांच्या वाहनांवर दंड तसेच चालक मालकांवर गुन्हे नोंदविले जात आहे. त्यामुळे रेतीचे भाव गगनाला भिडले आहे. बांधकाम व्यवसाय ठप्प पडले असून ठेकेदारांचे नुकसान होत आहे. ग्रामीण भागात अगोदर ४५० रूपयांना मिळणारी ट्रालीभर रेती दोन हजार रूपयांना तर शहरात तीन हजार रूपयांना विकली जात आहे. जिल्ह्यात वैनगंगा नदी ही प्रमुख असून तिचा प्रवाह तुमसर तालुक्यातून सुरू होवून पवनी तालुक्यात संपतो. लाखनी, साकोली व लाखांदूर तालुक्यातून चुलबंद नदी वाहते. बावनथडी तुमसर तालुक्याच्या काठावरून तर सुरू नदी मोहाडी तालुक्याच्या मध्यभागातून वाहते. पूर्व विदर्भात स्वच्छ व चांगल्या प्रतीची वाळू फक्त वैनगंगा नदीतून प्राप्त होते. मात्र वैनगंगा नदीवर गोसेखुर्द धरणामुळे पाण्याची पातळी वाढल्याने वाळूचा साठा लुप्तप्राय झाला आहे. खमारी, मांडवी गावापर्यंत पाणी साठल्या गेल्याने वाळूचा उपसा करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. इतर नदी पात्रातून मिळणारी रेती जाड व दगड गोट्यांची असल्याने मागणी फारसी नाही. व्यावसायीकांना इतर नदीपेक्षा वैनगंगेची रेती अधिक परवडण्यासारखी असल्याने व्यावसायीकांच्या नजरा मोहाडी व तुमसर तालुक्यातील घाटांकडे वळल्या. अवैध व्यवसायिकांनी गब्बर पैसा कमविण्याचे माध्यम म्हणून मागील वर्षापासून अवैध उपसा व वाहतूक करण्याचे धाडस केले.स्थानिक नागरिकांना मुठभर पैसा देवून त्यांनाही व्यवसायात सामिल करून घेतले. महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी पकडून चोरट्यांनी रेती परस्पर चोरून विकली आहे.
चोरीच्या रेतीचे भाव वधारले
By admin | Published: December 27, 2014 1:09 AM