आंधळगाव (भंडारा) : जनावरे वाहतुकीच्या वाहनावर दगडफेक प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत मोहाडी तालुक्यातील आंधळगावचे ठाणेदार सुरेश मट्टामी यांना शुक्रवारी पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी निलंबित केले. या दगडफेक प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली. कांद्री येथे बुधवारी रात्री दगडफेकीत एकजण गंभीर जखमी झाल्याने आठ जणांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री येथे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर दगडफेक करण्यात आली होती. यात वाहक मोहम्मद उस्मान माेहम्मद सुभान (३७, रा. बकरा कमेला, कामठी, जि. नागपूर) हा गंभीर जखमी झाला होता. गुरुवारी कामठी येथून वाहकाचे साथीदार आंधळगाव पोलिस ठाण्यात धडकले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आंधळगाव गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. आठ जणांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, शुक्रवारी पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी आंधळगावचे ठाणेदार सुरेश मट्टामी यांना निलंबित केले.
ठाणेदार मट्टामी आंधळगाव येथे फेब्रुवारी २०२१मध्ये रूजू झाले होते. सुरूवातीपासूनच ते वादग्रस्त ठरले होते. जनावरांच्या तस्करीत त्यांची भूमिका वादग्रस्त होती. बुधवारी झालेल्या दगडफेक प्रकरणातही त्यांची भूमिका संशयास्पद आढळून आली. त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आल्याने निलंबित करण्यात आले. आणखी दोन कर्मचारी याच प्रकरणात निलंबित होणार असल्याची माहिती आहे.
दगडफेक प्रकरणात आठ जणांना अटक
शेख माहसीन शेख नसिर (रा. कामठी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शेखर बडवाईकसह सात जणांवर भादंवि ३०७, ३४, १४३, १४७, १४८ आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कमल १३५ नुसार गुन्हा नोंदविला. गुरुवारी रात्री शेखर बडवाईक याला अटक करण्यात आली होती. शुक्रवारी आरोपी शेखर बडवाईक याच्या माहितीवरून चंद्रशेखर सुखराम कारेमोरे (२८), विलास संपत गिरेपुंजे (३२), प्रज्वल प्रल्हाद जाधव (२२), प्रांजल सोमा बालपांडे (२४), नितीन केशवराव नागफासे (३०), कैलास रामदास खेवले (३२), श्रेयस राजेश गडपायले (१९, सर्व राहणार कांद्री) यांना अटक करण्यात आली आहे.