आदिवासी संघटनांची मागणी : जिल्हाधिकारी यांना निवेदनभंडारा : देशातील आदिवासी समाज असंघटीत असल्याचा फायदा घेवून काही समाजकंटक स्त्रियांवर अत्याचार करीत आहे. राजकीय दडपणामुळे व आर्थिक व्यवहारामुळे गुन्हेगार बिनधास्त समाजात वावरतांना दिसत आहेत. महिलांवरील अत्याचार थांबण्यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे.पोलीस प्रशासनदेखील तक्रार दाखल करण्यास गेले पक्षावरच दबाव टाकतात ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. अशा प्रशासनाच्या विरुध्द जतेच्या मनात रोष निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.भंडारा तालुक्यातील दिघोरी येथे तिघांनी एका अल्पवयीन मुलीवर भरदिवसा उचलून नेऊन अत्याचार केला. याप्रकरणी कारधा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यापैकी एक मुलगा अल्पवयीन असल्याचे कारण सांगून त्याला सोडण्यात आल्याचे कळते. त्या अल्पवयीन मुलाला रिमांड होममध्ये पाठविण्याची कारवाई करावी. तसेच लाखनी तालुक्यातील खुर्शीपार येथील एका आदिवासी महिलेसोबत परसोडी गावातील इसमाने अश्लील व जातीवाचक बोलून महिलेचा हात पकडून विनयभंग केला. आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन लाखनी येथे गुन्हा दाखल झालेला असून आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. आरोपीला कोणत्याही दबावाखाली न येता त्वरित अटक करुन कठोर शिक्षा मिळावी यादृष्टीने पोलिसांनी कार्यवाही करावी, अशी मागणी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांचेमार्फत राज्यपाल यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गोवर्धन कुंभरे, ज्ञानेश्वर मडावी, ए. बी. चिचामे, जी. के. मडावी, मन्साराम मडावी, श्याम नळपते, विनायक मडावी, सुभाष मडावी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
महिलांवरील अत्याचार थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2016 1:02 AM