गावकऱ्यांची मागणी : ग्राम आंदोलन समितीचा आंदोलनाचा इशारा
भंडारा : धारगाव हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मुख्य गाव असून तिथे जनतेची खूप आवागमन असते. जवळपास २६ गावांच्या बाजारपेठेचे ठिकाण असल्यामुळे धारगाव येथे जलद एक्स्प्रेस बस थांबा देण्यात यावा या गावकऱ्यांच्या मागणीकरिता ग्राम आंदोलन समितीच्या वतीने विभागीय वाहतूक अधिकारी चंद्रकांत वडस्कर यांना निवेदन देण्यात आले. आधी जलद एक्स्प्रेस बस थांबत होत्या. मात्र, आता थांबत नाहीत. धारगाव येथे जलद एक्स्प्रेस बसचा थांबा येत्या ५ दिवसांत देण्यात यावा, अन्यथा धारगाव आणि अन्य गावांच्या हितकारी निर्णयाकरिता आंदोलनात्मक पाऊल उचलण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देताना प्रामुख्याने ग्राम आंदोलन समितीचे महेंद्र निंबार्ते, संजय भोले, मंगेश वंजारी, सचिन पंचबुद्धे, देवा बोदेले, अभय टेंभुर्णे आदी उपस्थित होते.