लाखांदूर : तालुक्यात एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसताना राजरोसपणे सर्वच रेती घाटांवरून अवैध रेती वाहतूक सुरु आहे. ही रेती वाहतूक थांबवावी अन्यथा ट्रॅक्टर फोडो आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदारांना निवेदनातून देण्यात आला आहे.
तालुक्यातील चुलबंद व वैनगंगा नदीवरील रेती घाटांच्या लिलावांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्याप लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे अवैध रेती तस्करीला उधाण आले आहे. प्रशासनाच्या अभयामुळेच रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे.
दरम्यान, तालुक्यातील सर्वच रेती घाटांवरून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी होत असल्याने रस्ते अपघातांमध्येही वाढ झाली आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तालुका प्रशासनाने तत्काळ अवैध रेती वाहतूक थांबवावी अन्यथा ५ मार्चपासून रेती भरलेले ट्रॅक्टर फोडो आंदोलन करण्याचा इशारा माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्ने, हरी लंजे यांनी दिला आहे.