बिडीओंना निवेदन : प्राथमिक शिक्षक संघाचा आंदोलनाचा इशाराभंडारा: मोहाडी तालुक्यातील शिक्षकांच्या समस्या सोडविण्याऐवजी त्यांना त्रास देण्याचा प्रकार वाढत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. समस्या सोडविण्यात दिरंगाई झाल्यास अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मोहाडी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी खंडविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.निवेदनानुसार, शिक्षण विभागातील एका लिपिकाने शालेय आॅडीटच्या नावाखाली मुख्याध्यापकांकडून ३०० ते ५०० रुपये वसूल केले आहेत. वरिष्ठ श्रेणी व इतर शिक्षकांचे एरिअर्सचे बिल एक ते दोन वर्षापूर्वी पात्र शिक्षकांना रक्कम अदा करण्यात आली. त्यानंतरही संबंधित केंद्रातील काम करणाऱ्या लिपीकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने शासकीय रकमेची अफरातफर केली. देयक ज्या शिक्षकाच्या नावे मंजूर केली ती रक्कम दुसऱ्याच्या नावावर बँक खात्यावर हेतूपुरस्सर वळती करण्यात आली आहे. काहींना नगदी रक्कम देण्यात आली आहे. ज्या शिक्षकांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली त्या शिक्षकांना मानसिक त्रास देण्याच्या दृष्टीने कारवाई करण्याबाबतचे पत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आले. शिक्षकांचे वैद्यकीय बिल एरिअर्स बिल काढण्यासाठी संबंधित शिक्षकांकडून लिपीक चिरीमीरी घेतल्याशिवाय बिल काढत नसल्याचेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या कारभाराची योग्य चौकशी करण्यात यावी, दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा मोहाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे. जून २०१५ चे मासिक वेतन अदा करण्यासंबंधाने संघटनेकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतरही लिपिकांनी वेतन देयक तयार केलेले नाही. याचा फटका शिक्षकांना बसला असून त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेकडून वेतनाचा पैसा आल्यानंतरही लिपिकाच्या निष्काळजीपणामुळे शिक्षकांच्या वेतनाला विलंब झाला आहे. हा अन्याय असून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ३ आॅगस्ट रोजी दुपारी ११ वाजता गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला घेराव करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक संघाने निवेदनातून दिला आहे. (नगर प्रतिनिधी)
शिक्षकांवरील अन्याय थांबवा
By admin | Published: August 02, 2015 12:51 AM