लाखनी-साकोलीच्या मधात मुंडीपार येथे भेल प्रकल्प प्रस्तावित आहे. २०१३ मध्ये या प्रकल्पासाठी ४८० एकर शेती संपादित करण्यात आली. १४ मे २०१३ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले. मात्र, त्यानंतर केवळ सुरक्षा भिंत बांधण्यापलीकडे भेलचे काम पुढे सरकले नाही. हा प्रकल्प झाल्यास शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. परंतु आता हा प्रकल्प थंडबस्त्यात पडला आहे. हा प्रकल्प तत्काळ सुरू करावा, यासाठी परिसरातील बेरोजगार तरुणांना व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्र पटले यांनी दिली. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. पत्रपरिषदेला मुंडीपारचे सरपंच हरिष लांडगे, शुभम मेंढे, अशोक उईके, साहेबराव पारधी उपस्थित होते.
बॉक्स
...तर जमिनी परत करा
भेल प्रकल्पासाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी ४८० एकर जमीन दिली. जवळपास २७० शेतकरी या प्रकल्पामुळे भूमिहीन झाले. जमीन संपादित करताना शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हा प्रकल्पच पूर्ण होण्याची खात्री दिसत नाही. त्यामुळे प्रकल्प होत नसेल तर आमची जमीन परत करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.