मुरमाडी सावरी येथे शुक्रवारी होत असलेल्या विवाह समारंभातील वधू अल्पवयीन असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने बाल संरक्षण अधिकारी नितीन साठवणे यांना दिली. त्यावरून त्यांनी लाखनी येथे जाऊन संबंधित कुटुंबाची माहिती मिळवून तक्रारीची खात्री केली. १२ वी वर्गात शिकत असलेल्या मुलीचे लग्न तिच्या कुटुंबीयांनी पवनी येथील सजातीय युवकासोबत निश्चित केले होते. लग्न शुक्रवारी दुपारी होणार होता .
त्यामुळे साठवणे यांनी सामाजिक कार्यकर्ता, स्थानिक कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांसह या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी मुलीच्या आईला अल्पवयात लग्न केल्यामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच कायदेशीर कारवाई बाबत माहिती देऊन लग्न रोखण्यात यश मिळविले. वर पक्षाला माहिती दिली असता लग्नासाठी आतापर्यंत झालेल्या खर्चाचा दावा केला. त्यावर कायदेशीर कारवाईची तंबी दिल्याने शेवटी वर पक्षही नरमला.
ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी यांच्या मार्गदर्शनात संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ता निखिल कानेकर समुपदेशक सरिता राहांगडाले, जयश्री मेश्राम ,अंगणवाडी पर्यवेक्षिका एम. एम. धरडे, लीला कुरसुंगे, ग्रामसेवक प्रमोद तिडके ,पोलीस कर्मचारी वासंती बोरकर, हवालदार पठाण उपस्थित होते.
कोट
शिक्षणाच्या अभावामुळे आपल्याकडे आजही बालविवाह होत आहे. ते थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन असा गुन्हा करणाऱ्यांची तक्रार केली पाहिजे. त्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून कधीही मदत मिळू शकेल.
नितीन साठवणे, बाल संरक्षण अधिकारी, भंडारा.