करडी (पालोरा) : करडी परिसराला पुन्हा ५ मे रोजी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने दणका दिला. सायंकाळी वादळी पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले. ग्रामीण भागात कौलारू घरांचे नुकसान होवून छतावरील कौला उडाल्या. विद्युत तारा तुटल्याने रात्रभर विज पुरवठा बंद पडला होता. अंधाराचे साम्राज्य पसरल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.करडी परिसरात सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान वादळी पावसाने कहर केला. रस्त्यावरील वाहतुक बंद पडली होती. रस्त्यावरून वाहने चालविणे कठीन होवून बसले होते. धुळ व कचरा यामुळे रस्त्याकडे पाहने दुरापस्त झाले होते. अचानक आकाशात ढग जमा होवून जोरदार वादळाची धुमश्चक्री सुरू होती. ग्रामीण भागातील बॅनर, होर्डींग कोसळली. टिनपत्रे उडाली. नागरिक मिळेल त्या साधनाचा वापर संरक्षणासाठी करताना दिसत होते. विद्युत तारांचे नुकसान झाले. काही ठिकाणी खांब वाकली. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता.कोका अभयारण्यातही वादळी पावसाचा फटका बसला. अभयारण्यातील झाडे कोसळली. अभयारण्य शेजारील गावातील कौलारू घरांचे नुकसान झाले. टिनाची शेड लांब अंतरांपर्यंत उडून कोसळली. यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. अनेक मार्गावरील झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प पडली. विद्युत तारा तुटल्या यामुळे रात्री विज पुरवठा बंद पडला होता. पिकांचे वादळी पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाले. आंब्याचे पिक त्यामुळे नुकसानग्रस्त ठरली. विद्युत पुरवठा बंद पडल्याने कार्यालयीन कामकाज विस्कळीत झाली. आठवडी बाजारात नागरिकांची त्रेधा उडाली. लग्न सराईवर परिणाम जाणवला. लग्नातील मांडव उडाले. मंडप डेकोरेशन मालकाचे नुकसान झाले. पावसामुळे विटभट्टीत पाणी शिरल्याने विटा भिजल्या. कामावरील मजुरांना पळता भुई थोडी झाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी उकाड्याने आरोग्यावर परिणाम जाणवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रोगराईचे प्रमाण वाढीची शक्यता व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
करडी परिसराला वादळी पावसाचा फटका
By admin | Published: May 07, 2016 1:03 AM