भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथील ग्रामपंचायत परिसरामधून नावाजलेली ग्रामपंचायत आहे. कोरोना विषाणूच्या महामारीने ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. विकासाच्या कामांना ब्रेक लागला आहे. अशातच विद्युत वितरण कंपनीने ग्रामपंचायतीला थकीत पथदिव्यांचे बिल भरणा करण्यासंबंधी नोटीस बजावून पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावातील नागरिकांना प्रकाश देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असली तरी पथदिव्यांच्या वीज बिलाची रक्कम भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. पथदिव्यांच्या बिलासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून जिल्हा परिषदेकडे वर्ग करीत असे. या प्राप्त झालेल्या निधीतून जिल्हा परिषद पथदिव्यांच्या बिलाचा भरणा करण्याची प्रचलित पद्धत सुरू होती; परंतु आता सदर पथदिव्यांच्या वीज बिलाचा भरणा करण्यासाठी जिल्हा परिषदेने हात झटकल्यामुळे बिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर आली आहे.
कोरोना विषाणूच्या महामारीने गावातील विकासकामे प्रभावित झाली आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या निधीतून पथदिव्यांच्या विजेचा बिल भरणा करावा, असे सांगून जिल्हा परिषदेने आपले हात झटकले आहेत; परंतु या निधीचा विनियोग करण्यासाठी एक वर्षापासून नियोजन करून शासनाच्या मंजुरीकरिता पाठविण्यात आले आहे. त्या मंजुरी प्रस्तावात पथदिव्यांच्या विद्युत बिलाचा समावेश नाही. शासनाने पंधराव्या वित्त आयोगाचा निधी गाव विकासासाठी ठेवून पथदिव्यांच्या विजेचा बिल भरण्यासाठी स्वंतत्र निधी द्यावा, अशी मागणी खुटसावरीचे सरपंच मनीषा वासनिक, उपसरपंच संदीप खंडाते, सदस्य ज्याेती नंदेश्वर, प्रियंका सार्वे व परिसरातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
कोट
महावितरण कंपनीने खुटसावरी परिसरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला असून, कोरोना संकटामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. ग्रामपंचायतीला एवढ्या थकीत रकमेचे विद्युत बिल भरणे शक्य नाही. पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदेने या विद्युत बिलाचा भरणा करण्याची गरज आहे.
- भागवत (बालू) मस्के, सामाजिक कार्यकर्ता