विशाल रणदिवे
अड्याळ : तब्बल दोन महिन्यांच्या प्रदीर्घ अंधकारमय वातावरणातून अड्याळ ग्रामपंचायत प्रशासनाने थकीत विद्युत बिलपैकी काही रकमेचा अड्याळ येथील विद्युत उपकेंद्र येथे भरणा केला. त्यामुळे उशिरा का होईना ग्रामस्थांना काळोखातून बाहेर काढले. पण जेव्हा पथदिवे वेळेवर सुरू होतात; पण वेळेवर बंद होत नाहीत, यावर ग्रामस्थांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.
गावाचा विकास साधायचा असेल तर लहान तथा क्षुल्लक बाब वाटत असली तरी त्याकडे बारकाईने ग्रामपंचायत प्रशासनाला लक्ष देणे गरजेचे आहे.
वेळेनुसार परिस्थितीनुसार बदल व्हायला पाहिजे किंवा स्वतःमध्ये बदल करणे महत्त्वाचे असते. असे म्हणतात, त्यानुसार आधी जिल्हा परिषदमार्फत पथदिव्यांची विद्युत बिल भरली जात होती आता ग्रामपंचायने ते बिल भरणे आहे याचाही विचार आज तत्काळ होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आता येथील तथा संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासनाने जागृत होऊन पथदिव्यांची वीज ठरावीक वेळेनुसार सुरू आणि बंद जर केली तर काय होऊ शकते याचाही विचार आज करणे गरजेचे झाले आहे.
गावातील पथदिवे सुरू झाली असली तरी अनेक ठिकाणचे पथदिवे बंद आहेत ते ठिकाण शोधून तेथील पथदिवे सुरू करून देण्याची मागणीसुद्धा यावेळी अड्याळ ग्रामस्थांनी केली आहे.
गावात गेली दोन महिन्यांपासून पथदिवे बंद होते गावातील गल्लो गल्लीत सगळीकडे अंधार होत असल्याने ग्रामस्थ मोठ्या चिंतेत होते. पण जेव्हा पथदिवे पुन्हा सुरू झाले. तेही वेळेत बंद करायला तयार नसल्यानेसुद्धा ग्रामस्थ चिंतेतच आहेत. ग्रामपंचायत प्रशासन जे विद्युत बिल भरणार त्यात काहीना काही तरी ग्रामस्थांचा मोठा वाटा असणार आहे. यामुळे अड्याळ ग्रामपंचायत प्रशासनाने वाट न पाहता किंवा लावता यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.