चुल्हाड (सिहोरा) : लॉकडाऊन कालावधीत सिहोरा पोलिसांनी मोहफूल दारू विक्रेत्यांना चांगलाच घाम फोडला आहे. ४६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ७ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या दहा जणांचे विरोधात दंड आकारण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे व पोलीस पथकाने केली आहे.
वैनगंगा, बावनथडी नद्याचे खोरे, सातपुडा पर्वत रांगांचे घनदाट जंगलात अवैध मोहफूल दारू विक्रीचे गाळप करण्यात येत आहेत. लॉकडाऊन कालावधीत परवाना प्राप्त दारू विक्रीला बंदी असल्याने मोहफूल दारूची मागणी वाढली असल्याने सिहोरा परिसरातील अनेक गावांत मोहफूल दारू विक्रीला ऊत आला आहे. गाव आणि गावांचे शेजारी मोहफुलांची दारू विक्री करण्यात येत आहे. दारू विक्रेत्यांचे एजंट गावांच्या शिवारात दारू पोहोचती करतात. याशिवाय त्यांनी प्लास्टिक पाऊच तयार केले असून त्यात दारूची पार्सल केली जात आहेत. तुमसर बपेरा राज्य मार्गावर असणाऱ्या देवसरा गावांत अनेक वेळा दारू विक्रेत्याचे विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मोहफूल दारू विक्रेत्यांच्या विरोधात सहायक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी लॉकडाऊन कालावधीत मोहीम राबवली असल्याचे धडक कारवाईवरून निदर्शनास येत आहे. या कालावधीत मोहफूल दारू विक्रेते ४६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाईत ७ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनेकांचे मोहफूल सडवा नष्ट करण्यात आलेला आहे. दारू विक्रेत्यांच्या विरोधात बेधडक कारवाईमुळे धाबे दणाणले आहे. नदीच्या काठावर मोहफूल दारूचे गाळप करण्यात येत आहे. दुसऱ्या टोकावर मध्यप्रदेशातील गावे असल्याने जणू यात्राच होत आहे. यामुळे नदीच्या काठावरील गावांत वास्तव्य करणारे नागरिक वैतागले आहेत. मोहफूल दारू विक्रीचे अड्डे नष्ट करण्याची मोहीम राबविण्यात आल्याने दारू विक्रेत्यांत भीती निर्माण झाली आहे. दरम्यान लॉकडाऊन घोषित असताना अनेकांनी नियम मोडले आहेत. यात सामान्य नागरिकांसह औषधी विक्रेते, व्यावसायिक, हॉटेल मालक अशा १० जणांच्या विरोधात दंड आकारून वसूल करण्यात आले आहे. यात औषधी विक्री करताना विना मास्कने विक्रेते आढळून आले आहेत. याशिवाय अन्य व्यावसायिकांनी नियम मोडले असल्याने १५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या दहा जणांच्या विरोधात भादंवि १८८, २६९, २७० च्या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बॉक्स
‘लॉकडाऊन कालावधीत मोहफूल दारू विक्रेते, नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
-नारायण तुरकुंडे, सहायक पोलीस निरीक्षक, सिहोरा