चरणदास बावणे।लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा कोसरा : झाडाच्या मुळांना कलात्मक दृष्टीने आकार देत काष्ठशिल्प घडविण्याचे काम ग्रामीण भागता राहणाऱ्या एका कलावंताकडून होत आहे. त्याचे काष्ठशिल्प कौतुकाचा विषय ठरत असून आपल्या सृजनशीलतेला आयाम देण्यासाठी हा ग्रामीण लोहार समाजाचा कलावंत कलेच्या क्षेत्रात आपले दमदार पाऊल टाकत आहे.भावड येथील गंगाधर केवळराम बावणे असे या कलावंताचे नाव. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण. पुढे शिक्षणात लक्ष न देता वडिलाच्या पिढीजात व्यवसायात मदत केली. लोहार, सुतारकाम करीत असताना लोखंड, लाकूड यांना आकार देण्यासाठी जीव ओतण्यास सुरुवात केली. पण लोहाराच्या व्यवसायात देखील आपला उदरनिर्वाह होईल का? असा प्रश्न गंगाधरला पडला. त्याने होमगार्डमध्ये भरती होऊन कायदा व सुव्यवस्था ठेवण्यात पोलिसांना मदत करण्याचे व्रत स्वीकारले. गृहरक्षक दलात वर्षातून तीन महिने काम मिळते. तेथे देखील अत्यल्प मजुरी मिळते. म्हणून आपल्या कलेला वाव देत त्याने वाळलेल्या झाडाच्या मुळांना योग्य आकार देत छंद जोपासण्याचा प्रयत्न चालविला आहे. वाळलेल्या मुळांवर निसर्गातील पशू, पक्ष्यांची कारागिरी करून त्याला योग्य आकार देत आहे. यामुळे काष्ठशिल्पकार म्हणून त्याचा लौकीक वाढत आहे. काष्ठशिल्प साकारल्यानंतर त्याची योग्य किंमत मिळत नसल्याची खंत गंगाधरने व्यक्त केली. लोहार ही अतिशय मागासलेली जात आहे. या जातीचा पिढीजात व्यवसाय लोखंडाचे अवजारे बनवून बाजारात विकण्यास मांडतात. यासाठी त्यांना भटकंती करावी लागते. मुळात हा समाज कारागिर आहे.गंगाधर बावणे यांनी अनेक काष्ठशिल्प बनविले आहे. त्यास योग्य वाव मियाल्यास त्याच्या शिल्पांना मागणी वाढून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह योग्यरित्या योग्य होऊ शकते. भावडसारख्या एका तीन हजार लोकसंख्येच्या खेड्यात अस्थायी होमगार्ड व उरलेल्या वेळात झाडांच्या मुळांमध्ये जीव ओतून शिल्प साकारत आहे. आपली ही कला वाढविण्याची त्याची इच्छा आहे. यासाठी अर्थसहाय्य मिळण्याची त्याची अपेक्षा आहे. एका होतकरू ग्रामीण कलावंताला मदतीचा हात देऊन त्याच्या स्वप्नाला आकार देण्याची जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.
मुळांमध्ये जीव ओतून साकारतो काष्ठशिल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:51 AM
झाडाच्या मुळांना कलात्मक दृष्टीने आकार देत काष्ठशिल्प घडविण्याचे काम ग्रामीण भागता राहणाऱ्या एका कलावंताकडून होत आहे. त्याचे काष्ठशिल्प कौतुकाचा विषय ठरत असून आपल्या सृजनशीलतेला आयाम देण्यासाठी हा ग्रामीण लोहार समाजाचा कलावंत कलेच्या क्षेत्रात आपले दमदार पाऊल टाकत आहे.
ठळक मुद्देभावडचा कलावंत : कारागिराची धडपड