शीतल शामराव तरोणे (१७, रा. एकोडी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मंगळवारी रात्री परिवारासोबत एकत्र जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले. रात्री अचानक शीतलला काहीतरी चावल्याचा भास झाला. मात्र, त्याकडे लक्ष दिले नाही. सकाळी तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला साकोली येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने भंडारा येथे उपचारासाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला. भंडारा येथे नेत असताना लाखनीजवळ तिचा मृत्यू झाला.
शीतल ही एकोडी येथील जिल्हा परिषद विद्यालयाची अकरावीची विद्यार्थिनी होती. शाळेत हुशार विद्यार्थिनी म्हणून ती समजली जात होती. तिच्या मागे आई-वडील, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. शीतलचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. बुधवारी सायंकाळी स्थानिक स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्यात गत काही दिवसांपासून सर्पदंशाच्या घटनेत वाढ झाली असून शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला आहे.