भंडारा : शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे. शिक्षणामुळेच विद्यार्थी घडतात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना जागृत करणे हेच शिक्षणसंस्थेचे मुख्य ध्येय आहे. तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे. तुम्हीच तुमचे शिल्पकार आहात, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.पवनी तालुक्यातील वलनी (चौ.) येथे गांधी विद्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ना.बडोले बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार अॅड.रामचंद्र अवसरे तर अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अॅड.आनंद जिभकाटे, उपाध्यक्ष रामदास शहारे, सुदाम खंडाईत, मनोहर देशमुख, किशोर तिघरे, जगदिश वाघमारे, विकास राऊत, देवानंद मोटघरे, सरपंच संगीता पंचभाई, किशोर भुरे, प्रा.बोरकर, इंजि. तिघरे, उपविभागीय अभियंता इंदूरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.ना.बडोले पुढे म्हणाले, आज पूर्वाश्रमीच्या भंडारा जिल्ह्यातील आपलाच माणूस मंत्री झाला म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत आहे. जिल्हा जरी वेगळा झाला असला तरी मी दोन्ही जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न प्राध्यान्याने सोडविन असे आश्वासनही त्यांनी दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे मन लावून अभ्यास करणे आवश्यक आहे व प्रगतीपथावर जावे, अंधकारातून प्रकाशाकडे जावे. आमच्या काळात शिक्षणाच्या सोयी फार कमी होत्या. तरी पण शिक्षण घेतले. तुमच्यासाठी सुसज्ज इमारत असून पोषक वातावरण आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग करावा.समाजकल्याण विभागातर्फे दलित, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग समाजाची जबाबदारी जनतेने मंत्री म्हणून माझ्यावर सोपविली आहे. त्यास यथोचित न्याय देण्याचा मी प्रयत्न करीन, विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपबाबत तसेच इतर अडचणीबाबत प्रश्न प्रामाणिकपणे करीन, असे ना.बडोले म्हणाले. विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचारापासून परावृत्त होऊन सकारात्मक दृष्टीकोनातून अभ्यास केला पाहिजे. तरच या विद्यार्थ्यांतून उद्याचे आय.ए.एस. आय.पी.एस. घडतील असेही ते म्हणाले.आमदार अॅड. अवसरे यांनी स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून समाजकल्याण विभागातर्फे भरीव मदत भंडारा जिल्ह्यासही मिळेल अशी अपेक्षा ना.बडोले यांचेकडून व्यक्त केली. तसेच संस्थापक तुकाराम मोटघरे यांनी जो शिक्षणाचा वृक्ष लावला त्यास संस्थाध्यक्ष जिभकाटे यांनी वटवृक्ष केला, असेही ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान व कला प्रदर्शनी लावली होती. या प्रदर्शनीचे मान्यवरांना हस्ते फित कापून उद्घाटन करून पाहणी करण्यात आली. या कार्यक्रमास नागरिक, महिला, विद्यार्थी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
शिक्षणामुळे विद्यार्थी घडतात
By admin | Published: December 29, 2014 12:59 AM