लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : टाकाऊ वस्तुतून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या कल्पक बुद्धीने प्रेरित झालेले लाखनी तालुक्यातील सोनमाळा व धानला (खराशी) येथील विद्यार्थ्यांनी सायकल रिक्षा व बैलबंडी आपल्याच कल्पक बुद्धीतून घडवली. नकारात्मकता झटकत सकारात्मक विचाराने एकत्रित आलेले गावचे विद्यार्थी परिसरात कौतुकास्पद ठरले.
कोरोना संकटाने सर्वांनाच संकटात ओढलेले आहे. या संकटात शाळा सुद्धा सापडलेल्या असून गत आठ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. परंतु ग्रामीण भागात विद्यार्थी आई-वडिलांपासून मोकळे होत मित्रमंडळींसोबत खुल्या रानावनात, गावातील मोकळ्या जागेत एकत्र येत कल्पना बुद्धीला चालना देत नवं करण्याच्या भूमिकेत आढळले. लाखनी तालुक्यातील सोनमाळा व धानला खराशी येथील विद्यार्थ्यांनी सायकल रिक्षा व बैलबंडी अडगळीतल्या घरच्याच साहित्यांनी बनवली. त्यांचे कल्पक बुद्धीचे पंख निश्चितच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख यासारखे प्रसंशनीय आहे.
ग्रामीण भागात अर्थव्यवस्था शेतीवर आजही ८० टक्केच्या वर अवलंबून आहे. घरातली करते मंडळी शेतीच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ अपुरा असतो. अशात होतकरू कल्पक बुद्धी चे विद्यार्थी गावातील मित्रांसोबत एकत्रित येत नवं काही करण्याच्या प्रेरणेने काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. ज्या विद्यार्थ्याला ज्या विषयात उत्साह असेल तो उत्साह पुढे आणीत इतरांना सुद्धा त्यांच्यात रममाण करीत अडगळीतल्या वस्तूंना टिकाऊ करीत कृषी क्षेत्रात उपयोगी पडणारे साहित्य तयार करण्याचा प्रयत्न करतात. एखादा कारखाना किंवा एखादे यंत्र तयार करण्याकरिता जशी अभियांत्रीकी शाळेतील अभियंते एकत्रित येत आपापल्या कलागुणांचा योग्य तो वापर करून अपेक्षित असलेले यंत्र घडवतात. अगदी तसंच ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा या कोरोणाच्या संकटकाळात आपली कल्पक बुद्धी वापरून आई-वडिलांना शेतीत उपयोगात असलेली साहित्य बनवीत इतरांना नवलात टाकले आहे . त्यांना भविष्यात योग्य ते मार्गदर्शन लाभल्यास निश्चितच त्यांची कल्पक बुद्धी गावासह देशाला सन्मान देईल हे निश्चित!
सोनमाळा व धानला खराशी येथील विद्यार्थ्यांनी सायकल व बैलगाडी घडवताना घरातलीच जुनाट असलेली निरुपयोगी ठरलेले साहित्य वापरीत कल्पक बुद्धीच्या योग्य तो वापर करून शेती उपयोगी साहित्य तयार केले. मी रस्त्याने प्रवास करताना त्यांच्या कलेकडे सहजतेने बघितले. त्यांनी वापरलेली कल्पक बुद्धी मला भावली. मी थांबून त्यांच्याकडून आस्थेने चौकशी केली. सायकल रिक्षा तयार करताना अडगळीतल्या जुन्या सायकलचे दोन चाक, आरसा, बांबू चे दोन राळ, त्यात पुढे चाक व हँडल असा रिक्षा घडवित मुले आनंदी दिसली. त्या रिक्षातून एकमेकाची बसून फेरी घातली.
धानला खराशी येथील विद्यार्थ्यांनी सुद्धा शेतावरील छोट्या लाकडांचा व बांबूंच्या उपयोग करीत आकर्षक बैलबंडी घडवली. तात्पर्य हेच कि विद्यार्थ्यांना कल्पक बुद्धीचा व स्वातंत्र्याचा आधार दिल्यास निश्चितच त्यांच्या कल्पक बुद्धीला वाव मिळून भविष्यात विद्यार्थी निश्चितच काही नाही काही करतील . याकरिता पालक व शिक्षकांनी त्यांच्यातील सुप्त गुणांना ओळखून त्यांना त्यांच्या सोयीने वाव देत प्रत्येक गावात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम निश्चितच दिसतील अशी आशा मला वाटते आहे.असे आमच्या शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्था खराशी अंतर्गत सर्वे निरीक्षणाअंती पुढे आलेला आहे.
-डमदेव कहालकर, संस्थाध्यक्ष शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्था खराशी.