मान्यता नसतानाही दिला प्रवेश : विद्यार्थ्यांची पोलिसात तक्रार दाखल भंडारा : बेला येथील आर.बी. जयस्वाल व्यवसायीक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यात प्रती विद्यार्थी ७० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी भंडारा पोलिसात आज तक्रार दाखल केली. भंडारा येथील ग्रामीण विद्या विकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आर.बी. जयस्वाल व्यवसायीक व औद्योगिक प्रशिक्षण संस्था बेला येथे सुरु आहे. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग मुंबई, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य व व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबईची मान्यता असल्याची बतावणी करून संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रीशियन व फिटर या प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला. तत्पूर्वी सदर संस्थाचालकांनी दहावी पास विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम दोन वर्षाचे असल्याचे सांगितले होते. सदर अभ्यासक्रम यशस्वीरित्या पास करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्याला प्रशिक्षण संस्थेकडून डिप्लोमा देण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिल्याने त्यांनी येथे प्रवेश घेतला होता. या सोबतच त्यांना शासनाकडून शिष्यवृत्तीही प्राप्त होईल असे सांगण्यात आले होते. मात्र अनेकांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप संतप्त विद्यार्थ्यांनी लावला आहे. संस्थाचालकांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आज मंगळवारला माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, यशवंत सोनकुसरे, मुकेश थोटे, रमेश माकडे आदींच्या नेतृत्वात कपील राखडे, राकेश मते, मयूर बालपांडे, वैभव उरकुडे, टेकराम आगाशे, धनंजय आगाशे आदी विद्यार्थ्यांनी भंडारा पोलिसात संस्थाचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यामुळे संस्थाचालकाचे धाबे दणाणले असून प्रशिक्षणार्थ्यांवर दबावतंत्राचा वापर सुरु असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)
आयटीआयच्या नावावर विद्यार्थ्यांची फसवणूक
By admin | Published: July 13, 2016 12:45 AM