लाखांदूर : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून, विद्यार्थ्यांनी बुद्धीचा सकारात्मक वापर करून राज्य व केंद्र शासनामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. या स्पर्धा परीक्षांची तयारी करतांना ध्येय निश्चित करून विद्यार्थ्यांनी यशाकडे वाटचाल करावी, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. २६ जुलै रोजी लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात लाखांदूर पोलीस विभागांतर्गत आयोजित स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, जिल्हा परिषद हायस्कूल, लाखांदूरचे मुख्याध्यापक रवी मेश्राम, डॉ. सुरेश ब्राह्मणकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, शुद्धमत्ता नंदागवळी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वासुदेव तोंडरे, जेसा मोटवानी यांसह अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. पटोले म्हणाले, एमपीएससी व राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा येत्या काही दिवसांतच घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी ध्येयवादी राहून त्यात यशस्वी व्हावे, हे यश प्राप्त करीत असताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाटचालीच्या दिशा ठरवायला हव्यात, असेदेखील आवर्जून सांगितले.
सहा जिल्ह्यांतील ६३ तालुक्यात सर्व सोयींनी युक्त अशी सुसज्ज ग्रंथालये निर्माण करण्यात येणार आहेत, असे आमदार अभिजीत वंजारी यांनी सांगितले. जिल्ह्याच्या ठिकाणी पदवीधर भवन निर्माण होणार असून, या पदवीधर भवनातून सुशिक्षित युवकांना स्वयंरोजगार, मार्गदर्शन इत्यादी सोयी पुरविल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गत वर्षभरापूर्वीपासून लाखांदूर येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, अमोल कोकाटे व पोलीस अंमलदार मनीष चव्हाण यांच्यामार्फत दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सराव परीक्षेचे आयोजन करण्यात येत होते. त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या या युवकांना भंडारा पोलीस दलातर्फे स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण करण्यात आले.
पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी प्रास्ताविक केले. पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम यांनी सूत्रसंचालन केले, तर उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी लाखांदूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरसेन चहांदे, पुंडलिक मस्के, पोलीस उपनिरीक्षक अमोल कोकाटे, अमरदीप खाडे, विष्णू कराळे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बॉक्स :
जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण
लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात नाना पटोले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार अभिजीत वंजारी, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक रवी मेश्राम, अरुण पारधी, प्रेमलाल गावडकर, प्रतिभा पडोळे, राजश्री शेंडे, नितीन पारधी, उमाकांत येडे यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षक उपस्थित होते.
280721\img20210726141719.jpg
पुस्तक वितरण करतांना नाना पटोले, आमदार अभिजीत वंजारी, पोलीस अधिक्षक वसंत जाधव व ईतर मान्यवर