शालेय पोषण आहारतील प्रकार : मूग डाळीचा होतोय पुरवठा, पुरवठा होणारे धान्य निकृष्टप्रशांत देसाई भंडाराइयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सकस आहार मिळावा, या उद्देशाने शाळांना शालेय पोषण आहार पुरवठा करण्यात येतो. मात्र, मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील शाळांना तूर डाळीचा होणारा पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. त्याऐवजी मूग डाळीचे वाटप होत असून तेही अत्यल्प होत असल्याने विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तुलनेत उच्च दर्जाचे शिक्षण देणे व त्यासोबतच विद्यार्थ्यांमधील कुपोषणावर आळा बसावा यासाठी शालेय पोषण आहारचा पुरवठा करण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला सध्या हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना ‘प्रोटीनयुक्त’ आहाराऐवजी निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करण्यात येत आहे. राज्य शासन सर्वसामान्यांना स्वस्त तूरडाळ देण्याचा दावा करत असतानाच शालेय पोषण आहारातून तूर डाळ महागाईमुळे गायब झाली आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी आलेल्या शालेय पोषण आहाराच्या कोट्यात तूर डाळच नाही. त्यामुळे वरणभातापासून शालेय विद्यार्थी वंचित झाले आहेत.जिल्ह्यातील शाळांना आॅक्टोंबर महिन्यापासून पोषण आहारासाठी ते धान्य पुरविण्यात आले. त्यात तूर डाळीचा प्रस्तावच नाही. महागाईमुळे तूर डाळ देण्यात आली नसल्याची माहिती आहे. परंतु तूर डाळ वजा करताना त्याऐवजी मुग डाळीचा अत्यल्प पुरवठा करण्यात आला. परंतु तूर डाळीच्या वरणासोबत भात खाणारे विद्यार्थी मूग डाळीकडे बघायला तयार नाहीत. त्यामुळे शालेय पोषण आहार शिजविणाऱ्यांसाठी चांगलीच अडचण झाली आहे. प्रशासनाने आठवड्याचे वेळापत्रक ठरवून दिले आहे. त्यानुसार सोमवारी विद्यार्थ्यांना तूर डाळीचे वरण देणे बंधनकारक आहे. सोमवारी तूरडाळ मंगळवारी वाटाणे, बुधवारी मूगडाळ, गुरूवारी वाटाणे, शुक्रवारी चवळी, शनिवारी वाटाणे देण्याचा शिरस्ता आॅक्टोंबरपर्यत कायम होता. मात्र नोव्हेंबर महिन्यात शालेय पोषण आहाराच्या कोट्यात तूरडाळच न आल्याने सोमवारच्या आहारात काय द्यावे हा प्रश्न आहे. नाईलाजाने शिक्षक दररोजच्या आहारात विद्यार्थ्यांना मूग डाळ देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वरण भाताचे आहारापासून वंचित राहावे लागत आहेत. बाजारपेठेत तूर डाळीचे किरकोळ विक्रीचे दर सध्या १८० ते २०० रूपये किलोप्रमाणे आहेत. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे दर गेले आहेत. भंडारा धान उत्पादक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पुरवठा होणारे धान्य निकृष्ट दर्जाचे आहेत. पुरवठा होणारी मुग डाळ आवश्यकतेनुसार न मिळता कमी मिळत आहे. शिजत नसलेला वाटाणा व बुबुळ लागलेल्या चवळीचा पुरवठा होत असल्याची शिक्षकांची ओरड आहे. नोव्हेंबरला धान्य मिळाले होते. जानेवारीतही डिसेंबरचे धान्य मिळाले नसल्यामुळे अनेक शाळांमधील पोषण आहार साहित्य संपल्याने शाळेतील आहार शिजविणे बंद झाले असून विद्यार्थी घरूनच माध्यान्ह भोजनाचे टिफिन आणत आहेत.मागील तीन महिन्यांपासून तूर डाळीचा पुरवठा बंद आहे. त्यामुळे तूर डाळीचे वरण विद्यार्थ्यांना दुरापस्त झाले आहे. सोबतच पुरवठा होणारा धान्य निकृष्ट असते. पोषण आहाराबाबत शिक्षकांवरच खापर फोडण्यात येत असल्याचा आरोप राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांनी केला आहे.
तूर डाळीच्या वरणाला ‘मुकले’ विद्यार्थी
By admin | Published: January 03, 2016 1:14 AM