जे.एम. पटेल महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन : पुरणचंद्र मेश्राम यांचे प्रतिपादनभंडारा : विद्यार्थ्यांनी केवळ विद्या शिकू नये तर त्यांनी प्रज्ञेचा अंगीकार करावा. या जगात श्रीमंत वंदनीय नाहीत, तर ज्या महापुरुषांनी आपले जीवन समाजासाठी झिजविले आणि नवीन विचार निर्माण केले तेच महापुरुष वंदनीय आहेत. विद्यार्थ्यांनी महापुरुषांकडून प्रज्ञा शिकावी, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तकडोजी महाराज विद्यापीठाचे रजिस्ट्रार पुरणचंद्र मेश्राम यांनी केले.येथील जे.एम. पटेल महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन दिन सोहळा शुक्रवारी पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी महाविद्यालयाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती उत्सव समारोह आणि राष्ट्रीय युवा सप्ताह यांच्या स्पर्धांचेही पारितोषिक वितरण केले. ज्या विविध स्पर्धांचे आयोजन केले त्याचेही बक्षीस वितरण करण्यात आले. येथे यावर्षी महाविद्यालयाने घेतलेल्या सांस्कृतिक व बौद्धिक वार्षिक स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कर्तुत्व या विषयावर आयोजित करून त्यांना आदरांजली वाहिली. पुरणचंद्र मेश्राम यांनी या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे कौतुक केले. ते म्हणाले, शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना रोजगारासाठी पात्र बनविते, त्यांना रोजगारक्षम बनवीत नाही. पात्र विद्यार्थ्यांना ही रोजगारक्षमता परिश्रमपूर्वक आणि जाणीवपूर्वक स्वत:त निर्माण करावी लागेल. प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी महाविद्यालयाने केलेल्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेताना त्यात शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक केले. ते म्हणाले, ग्रामीण क्षेत्रात येणाऱ्या अनेक मर्यादानांही आमचे विद्यार्थी दाद देत नाहीत आणि या अडथळ्यांना ते जुमानत नाहीत. समस्यांतून आणि मर्यांदातून मार्ग काढत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत नाव झळकाविणाऱ्या, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडास्पर्धांत कर्तुत्व गाजविणाऱ्या आणि दिल्लीच्या परेड मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाला सार्थ अभिमान आहे. ते येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणेचे स्त्रोत आहे. गोंदिया शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मुकेश पटेल यांनी विद्यार्थ्यांना प्रेरक मार्गदर्शन केले. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालय कौंसीलच्या सचिव प्रा. ममता राउत आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक चानखोरे उपस्थित होते. विद्यापीठ स्तरावर शैक्षणिक, क्रीडा आणि राष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व गाजविणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२५ व्या जयंती महोत्सवाच्या आणि युवा सप्ताहाच्या स्पर्धा व महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिक वितरीत करण्यात आले. गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. आभार प्रदर्शन डॉ. कार्तिक पणिक्कर यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी महापुरुषांकडून प्रज्ञा शिकावी
By admin | Published: January 31, 2016 12:40 AM