मार्च महिना लोटूनही गत खरीप हंगामातील धानाची अद्याप उचल करण्यात न आल्याने, गोंडसावरीतील शेतकरी अडचणीत सापडले होते. ऐन वेळी तालुका खरेदी-विक्री संघाने धान मोजणीस असमर्थता दाखविल्याने तब्बल साडेतीन हजार पोती धानाचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. भविष्यात होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी माध्यमांनी हा विषय उचलून धरला होता.
त्याचप्रमाणे, संतापलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन सोपवून आपली कैफियत मांडली. यावर वेगाने प्रशासकीय सूत्र हलवत तहसीलदारांनी तातडीने मंडळ अधिकारी शेखर जाधव यांना जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याची सूचना केली. त्यानुसार, जाधव यांनी अहवाल तहसीलदारांना सुपुर्द केला. अहवालाचा आढावा घेताच, विराणी यांनी सायंकाळी धानखरेदी तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. या आदेशात ग्रामपंचायतीच्या सभागृहाचा गोडावून म्हणून तात्पुरता वापर करण्याचे सुचविण्यात आले आहे.
बॉक्स
‘खरेदी विक्री’च्या भूमिकेकडे लक्ष
तालुका खरेदी-विक्री संघाच्या वेळकाढू धोरणामुळे गोंडसावरीतील शेतकऱ्यांवर ही वेळ आली. आता तहसीलदारांच्या आदेशानंतर किती दिवसांच्या आत धानखरेदी प्रक्रिया सुरू होणार, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.