साकोली : सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कलात्मक गुणांसह गुणात्मक विकास होताना दिसून येत आहे. परंतु, नुकत्याच लागलेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेच्या निकालात जिल्हा परिषद हायस्कूल साकोलीचे यश अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी विद्यार्थी सत्कारप्रसंगी केले. ते साकोली येथे विद्यार्थ्यांच्या सत्कार समारोह प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर कोरे, मुख्याध्यापक रवी मेश्राम, उमेश चोले, नितीन वाघमारे, अरुण पारधी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी डोर्लीकर यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत राष्ट्रीय पातळीसाठी पात्र विद्यार्थ्यांसह लाखांदूर येथील मुख्याध्यापक रवी मेश्राम यांचा सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक रवी मेश्राम यांनी हे यश विद्यार्थ्यांचे असून, यासाठी शिक्षकांनी मोठी मेहनत घेतली असून, अनेक वर्षांपासून शाळेत ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी रविवारी घेण्यात येणारे शिकवणी वर्ग व सराव परीक्षा, स्पर्धा परीक्षेसह इतर उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत शाळेतील १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली. दोन्ही उत्तीर्ण विद्यार्थी कमी आर्थिक गटातील असूनही त्यांनी यश प्राप्त केल्याचा सार्थ अभिमान असल्याचे मुख्याध्यापक उमेश चोले यांनी सांगितले. संचालन खोब्रागडे यांनी केले. आभार मुख्याध्यापक उमेश चोले यांनी मानले.
जिल्हा परिषद हायस्कूल साकोलीचे यश अनन्यसाधारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:24 AM