पालांदूर (भंडारा) : महिन्याभरापूर्वी सासरी आलेल्या पोलीस शिपायाने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गावालगतच्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. अंकुश श्रीराम बडगे (५५, रा. हिंगोली) असे मृत शिपायाचे नाव आहे. ही घटना लाखनी तालुक्यातील इसापूर येथे घडली. मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे.हिंगोली जिल्ह्यातील नरसी (नामदेव) या पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई या पदावर अंकुश बडगे कार्यरत होते. गत महिन्याभरापासून ते सासुरवाडी असलेल्या इसापूर येथे आले होते. मात्र ते मानसिक तणावात असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. याच तणावात त्यांनी इसापूर येथील तलावात २२ फेब्रुवारीला रात्री १२ वाजताच्या सुमारास तलावात उडी घेतली. यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. पालांदूर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना मानसिक त्रासरविवारी सकाळी तलावातून बडगे यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी लाखनी येथे नेण्यात आले. मात्र तेथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह पालांदूरला न्यावे किंवा तिथून डॉक्टरांना बोलवावे, असे बोलले. आधीच दु:खात असलेल्या बडगे कुटुंबीयांना डॉक्टरांच्या अशा वागण्यानं आणखीच संकटात टाकले. याचवेळी पालांदूरचे पोलीस निरीक्षक अंबादास सुनगार यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा करून लाखनी ग्रामीण रुग्णालयातच उत्तरीय तपासणीची तयारी केली. परंतु तोपर्यंत नातेवाईकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. पालांदूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन गृह नसल्याने समस्या वाढली आहे. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते यांनी, पालांदूर येथे जागेची पुर्तता पुर्ण होताच शवविच्छेदन गृह बांधण्यात येईल, असे सांगितले.
पालांदूर येथील रुग्णालयात शवविच्छेदन गृह नाही. परिणामी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह लाखनी किंवा भंडारा येथे पाठवावे लागते. शवविच्छेदनगृहासाठी जागेची मागणी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे. मात्र यावर निर्णय झालेला नाही.- डॉ. ललित नाकाडेवैद्यकीय अधीक्षक पालांदूर